वेंगुर्ल्यात ठाकरे गटाच्यावतीने विनायक राऊत यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Edited by: दिपेश परब
Published on: June 30, 2023 16:56 PM
views 136  views

वेंगुर्ले : राजकारणाचा पाया हा समाजसेवा आहे. समाजात यशस्वी कामगिरी करणाऱ्या प्रत्येक घटकांचा सन्मान करणे ही बाळासाहेबांची शिकवण आहे. याचप्रमाणे तालुक्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे वेंगुर्ल्यातील पदाधिकारी प्रत्येक वर्षी करतात हे कौतुकास्पद आहे. भविष्यात शैक्षणिक जीवनात कोणतीही मदत लागूदे आम्ही सर्वजण आपल्या नेहमी पाठीशी राहणार असल्याचे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी वेंगुर्ला येथे केले. 



   उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना वेंगुर्लच्या वतीने शुक्रवारी (३० जून) येथील साई डिलक्स हॉल येथे तालुक्यातील दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा  सत्कार व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख संपन्न झाला. यावेळी लोकसभा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख संजय पडते, शिवसेना नेते अतुल रावराणे, जिल्हा माहीला संघटक जान्हवी सावंत, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख शैलेश परब, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, मुंबई उपविभाग प्रमुख श्री. परब, विजू गावडे, उपजिल्हा प्रमुख प्रकाश गडेकर, तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, ऍड जी. जी. टांककर, वेंगुर्ले तालुका महीला संघटक सुकन्या नरसुले, शहर प्रमुख अजित राऊळ, युवा सेना प्रमुख पंकज शिरसाट, वायंगणी सरपंच सूनम कामत, विभाग प्रमुख संदिप पेडणेकर, उपतालुकाप्रमुख तुकाराम परब आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. 

    यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदार संघ संपर्क प्रमुख शैलेश परब यांच्या वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले तालुक्यातील पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरूपात वह्या वाटप करण्यात आले.  तसेच त्यांचा वेंगुर्ला उ.बा.ठा. शिवसेनेच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. तर कोकण आयडॉल पुरस्कार प्राप्त कुडाळ उपनगराध्यक्ष व युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांचा खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी वेंगुर्ले तालुक्यात दहावी बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या १०३ विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, सन्मानचिन्ह देवून खासदार व इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


तालुका प्रमुख यशवंत परब व येथील सर्व कार्यकर्ते केवळ राजकारण न करता लोकसभा मतदार संघ संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर व विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख शैलेश परब यांच्या मार्गदर्शनाखाली कोणत्याहि आमिषाला बळी न पडता हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे व सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील लोकांना अभिप्रेत असलेले सामाजिक कार्य करीत आहेत. हे अभिमानास्पद असून त्यांनी हे कार्य असेच पुढे सुरू ठेवावे आपली नेहमीच साथ राहील अशी कौतुकाची थापही यावेळी खासदार विनायक राऊत यांनी दिली.


 वेंगुर्ल्यात दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित केला जातो कोणत्या नेत्यांसाठी केला जात नाही. सामान्य कुटुंबातील विद्यार्थी उत्तम गुणवत्ता घेऊन पुढे येत आहेत हे कौतुकास्पद आहे. या विद्यार्थ्यांमुळेच सिंधुदुर्गाचे नाव उच्च शिखरावर पोचले असल्याचे यावेळी शैलेश परब यांनी बोलताना सांगितले. तर कोकण विभाग अव्वल हे ऐकून नेहमीच अतिशय आनंद होतो. विद्यार्थी यशस्वी होतात हे त्यांचे त्या विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक व आई वडिलांच्या मेहनतीचे फळ आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे ऍडमिशनसाठी अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधावा असे यावेळी अरुण दुधवडकर यांनी सांगितले.

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन तालुका प्रमुख यशवंत परब यांनी तर आभार शहर प्रमुख अजित राऊळ यांनी मानले.