स्त्री-पुरुषांनी सामाजिक प्रश्नांवर लक्ष देण्याची गरज :अभिनेत्री अक्षता कांबळी

जनजागृती सेवा समिती महाराष्ट्राच्या वतीने महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा करण्यात आला सन्मान
Edited by:
Published on: March 09, 2023 09:27 AM
views 289  views

कणकवली : महिला दिन केवळ महिलांपुरताच मर्यादित ठेऊन पुरुषांचा तिरस्कार का करायचा? महिला दिनाच्या निमित्ताने पुरुषांनीही एकत्र येऊन विचार करणे आवश्यक आहे. स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन समाजातील प्रश्न आणि समस्यांवर उपाय शोधणे गरजेचे आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री आणि सिंधुरत्न फाउंडेशन च्या अध्यक्षा अक्षता कांबळी यांनी मांडले. जनजागृती सेवा समिती, महाराष्ट्र यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. 

जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील नारी शक्तीचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृती सेवा समिती, महाराष्ट्र यांच्यावतीने विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार समारंभ कणकवली येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी सिंधुरत्न फाउंडेशन च्या अध्यक्षा अक्षता कांबळी, जीवनस्त्रोत सेवा संस्थेच्या अध्यक्षा शीतल मांजरेकर, लावण्यसिंधु चित्रपट संस्था आणि सिंधुदुर्ग जिल्हा गाबीत समाज संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, जनजागृती सेवा समिती, महाराष्ट्रचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, कवी, पत्रकार श्रेयश शिंदे आदी उपस्थित होते. 

अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी आपल्या अभिनय क्षेत्रातील वाटचालीविषयी सांगताना आलेल्या अडथळ्यांचा सामना त्यांनी कसा केला त्याविषयी आपले अनुभव मांडले. महिला दशावतार पासून मराठी मालिका, चित्रपट आणि बॉलिवूड पर्यंतचा प्रवास त्यांनी कसा केला आणि त्यात त्यांना पतीची आणि पुरुष कलाकारांची कशी साथ लाभली तेही सांगितले. स्त्री आणि पुरुषांनी महिला दिनाच्या निमिताने एकत्र येऊन समाजातील प्रश्नांवर उत्तर शोधावं, असे आवाहनही त्यांनी केले. वर्षाचे 365 दिवस महिला दिन तेव्हाच साजरा होईल जेव्हा महिला स्वतःच्या पायावर स्थिर होईल. महिलांनी चूल आणि मूल याच्या पुढे येऊन स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करायला हवा. ज्या क्षेत्रात केवळ पुरुषांचीच मक्तेदारी होती, त्या क्षेत्रात महिलांची चाललेली वाटचाल नवी ऊर्जा देणारी आहे, असे मत शीतल मांजरेकर यांनी मांडले. चंद्रशेखर उपरकर यांनी विविध क्षेत्रातील स्त्रियांच्या कामाचे कौतुक केले. स्त्री आणि पुरुष हे एकमेकांना पूरक आहेत. स्ट्रगल हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. स्त्रियांनीही आपल्या क्षेत्रात काम करताना येणाऱ्या संकटांचा सामना करत आणि आपल्यातील नेतृत्त्व विकसित करत आपल्या क्षेत्रात यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ग्लोरी कदम, अनुराधा निग्रे, प्राची कांबळी, सुजाता अक्कतंगेरहाट, संयोगीता मुसळे, पल्लवी कोकणी, मृण्मयी जाधव, सलोनी चाळके, जान्हवी भोसले, कविता मसुरकर, कल्पना मसुरकर, शुभांगी उबाळे, दीव्या साळगावकर, मिनल पाटील, अमिता राणे, श्रध्दा तावडे आदी महिलांना सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. गुरुनाथ तिरपणकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले तर संयोगीता मुसळे यांनी आभार मानले.