
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या नवनिर्वाचित संचालकांनी नुकतीच सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक बाळ परब यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी पतसंस्थांच्या विविध समस्यांवर आणि फेडरेशनच्या आगामी वाटचालीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ, कार्याध्यक्ष जॉय डॉन्टस, उपाध्यक्ष नंदकिशोर कोरगांवकर आणि सुनील नाईक उपस्थित होते. तसेच, संचालक बाबूराव कविटकर, समीर वंजारी, सुभाष चौधरी, सावंतवाडीचे सहाय्यक निबंधक सुजय कदम आणि पतसंस्था फेडरेशनचे सचिव महेश्वर कुंभार हे देखील उपस्थित होते.
चर्चेदरम्यान, पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण अनिवार्य असल्याने फेडरेशनतर्फे लवकरच प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ठरले. प्रत्येक दोन तालुक्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. पतसंस्थांसमोरील कर्जवसुलीची मोठी समस्या लक्षात घेता, यावर उपाययोजनांबाबतही सविस्तर चर्चा झाली. यापुढे पतसंस्था फेडरेशन अधिक प्रभावीपणे काम करून पतसंस्था चळवळ सक्षम करणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
जिल्हा उपनिबंधक बाळ परब यांनी पतसंस्था चळवळीचे महत्त्व अधोरेखित केले. ही एक महत्त्वाची चळवळ असून ती अधिक गतीने पुढे नेण्यासाठी पतसंस्था फेडरेशनची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले. फेडरेशन जे उपक्रम हाती घेईल, त्याला आपले पूर्ण सहकार्य राहील असे आश्वासन परब यांनी दिले. तसेच, फेडरेशनकडून मार्गदर्शन शिबिरे आणि प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावीत असे आवाहनही त्यांनी केले.