तेरवण - मेढे, भेडशी येथे वीजग्राहक संघटनेची बैठक

अनेक प्रश्नांवर चर्चा
Edited by: लवू परब
Published on: July 25, 2024 13:17 PM
views 139  views

दोडामार्ग  :  वीज ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी लढा देणे गरजेचे आहे. त्यासाठी आपली सर्वांची एकजुट आवश्यक आहे. एकटा ग्राहक अन्याय सहन करत राहतो माञ संघटना असेल तर न्याय नक्की मिळेल त्यासाठी आपल्या हक्कासाठी एकजुट आवश्यक आहे असे प्रतिपादन वीजग्राहक संघटना व जिल्हा व्यापारी संघ समन्वयक अॅड.नंदन वेंगुर्लेकर यांनी तेरवण-मेढे, भेडशी येथे आयोजित केलेल्या बैठकीत केले. 

वीज ग्राहक संघटना व जिल्हा व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तेरवण-मेढे ग्रामपंचायत कार्यालयात तर भेडशी दामोदर सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा समन्वयक अॅड.नंदन वेंगुर्लेकर, दोडामार्ग वीजग्राहक संघटना अध्यक्ष सुभाष दळवी, सचिव भूषण सावंत, उपकार्यकारी अभियंता श्री.नलावडे, सिद्धेश केसरकर, नंदु टोपले, सावंतवाडी अध्यक्ष संजय लाड, तेरवण-मेढे सरपंच सौ.सोनाली गवस, हेवाळे उपसरपंच समिर देसाई, मदन राणे, संदेश राणे, दत्ताराम देसाई, सदाशिव गवस-पिकुळे, मायकल लोबो, दिनेश नाईक-उसप, तेरवण-मेढे येथे ४० तर भेडशी येथे ५२ वीजग्राहक उपस्थित होते.

यावेळी अभियंता नलावडे यांनी सातत्याने मुसळधार पाऊस व वारा असल्याने विद्युत तारा व खांबांवर झाडे पडत असल्याने विद्युत पुरवठा खंडित होत आहे. अपुरा वायरमन कर्मचारी असल्याने समस्या निर्माण होत आहे. गावपातळीवर वीजग्राहकांनी सहकार्य करावे, लाईन साफसफाई करावी असे आवाहन केले. तर १२ आॅगस्ट रोजी वाढीव वीजबीलबाबत तेरवण-मेढे येथे बिलिंग विभाग कर्मचारी येऊन अडी-अडचणी, समस्या, शंकांचे निरसन करतील असे सांगितले. यावेळी आगामी काळात सुरळीत वीज सेवेबाबत सकारात्मक चर्चा झाली.