'परवानगीशिवाय भेटा' | 'या' अधिकाऱ्याचा हा फलक ठरतोय लक्षवेधी

जनतेशी थेट संपर्क ठेवण्याचा नवा "फॉर्म्युला" होतोय लोकप्रिय
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 16, 2022 17:41 PM
views 162  views

कणकवली : कणकवली सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या कार्यकारी अभियंता पदी नव्याने रुजू झालेले कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी आपल्या कामाच्या "हटके" स्टाईल च्या माध्यमातून जनतेशी थेट संपर्क ठेवण्याचा नवा "फॉर्म्युला" अमलात आणला. दोन दिवसांपूर्वीच कणकवली सार्वजनिक बांधकाम च्या कार्यकारी अभियंता पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच कार्यकारी अभियंता यांची नेहमीच या - ना त्या कारणांनी बंद असलेली केबिन आता जनसामान्यांसाठी खुली झाली. नुसती खुली नाही तर या केबिन च्या दरवाजावर कार्यकारी अभियंता श्री. सर्वगोड यांनी थेट पाटी लावली की "आत येऊन बसावे, परवानगीची आवश्यकता नाही" केबिनच्या बाहेर तासान तास भेटीसाठी ताटकळत राहणारे अभ्यागत, या सर्वांना थेट सामोरे जाण्याची ही कार्यकारी अभियंता सर्वगोड यांची "हटके" स्टाईल सध्या कणकवली चर्चेचा विषय बनली आहे.

एवढेच नव्हे तर कार्यालयाच्या दरवाज्यावर ही पाटी लावत असताना कार्यकारी अभियंता श्री. सर्वगोड यांनी आपला मोबाईल नंबर व व्हाट्सअप नंबर देखील सर्वसामान्य जनते करिता आपल्या दरवाज्यावर पाटीवर नोंदवून खुला ठेवला आहे. जेणेकरून कुणीही व्यक्ती आपली थेट समस्या श्री सर्वगोड यांच्याकडे मांडू शकणार आहे. यामुळे साहेब मिटींग मध्ये आहेत, साहेब बिझी आहेत, ही उत्तरे आता बंद होणार आहेत.

आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम सारख्या राबता असणाऱ्या विभागात ही "हटके" स्टाईल केव्हा पहायला मिळाली नव्हती. त्याचा "श्री" गणेशा सर्वगोड यांनी सुरू केला. व हा श्री गणेशा सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर इतर प्रशासकीय विभागातील अधिकाऱ्यांना देखील प्रेरणा घ्यायला लावणार आहे. व खऱ्या अर्थाने सर्वगोड यांनी नावाप्रमाणे आपल्या कामाची सुरुवात देखील गोड उपक्रमाने केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.