
सावंतवाडी : रेफरल टू बांबोळी, सिंधुदुर्गतील रूग्णांची ही वारी काही थांबता थांबत नाही आहे. सोमवारी मध्यरात्री गोवा - बांबोळी येथे रुग्ण घेऊन जाणाऱ्या 108 रुग्णवाहिकेने अचानक पेट घेतला. रात्री २ च्या सुमारास कोलवाळ -गोवा येथे ही रूग्णवाहीका जळून खाक झाली. रुग्णवाहिकेवरील डॉक्टर व चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. गोवा अग्निशमन दलाच्या जवानांनी नंतर ही आग आटोक्यात आणली.
ही रुग्णवाहिका दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाची असून सावंतवाडी उपजिल्हा येथून रुग्ण घेऊन गोवा येथे जात होती. कोलवाळ येथे रुग्णावाहीका गेली असता गाडीतून धूर येते असल्याचे निदर्शनास आले. डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत चालकाला गाडी थांबविण्यास सांगितली. गाडीतील रुग्ण व नातेवाईकाला बाहेर काढत सुखरूप ठेवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. रूग्ण सिरीयस नसल्याने हे करता आलं. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. दुसऱ्या रुग्णवाहिकेने रुग्ण गोवा येथे पाठविण्यात आला. म्हापसा येथील अग्नीशमन बंबाच्या सहाय्याने ही आग विझविण्यात आली. ही रुग्णवाहिका दोडामार्ग प्राथमिक आरोग्य केंद्राची आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या वेंगुर्ला वजराठ येथील एका रुग्णाला लघवीचा त्रास जाणवत असल्यामुळे ती मागविण्यात आली होती. तो रुग्ण स्टेबल असल्यामुळे घटना घडल्यानंतर रूग्ण चालत बाहेर आला. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.