लाकूड वाहतूक पासवर मेधा पाटकर यांचा फोटो

आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांचा आरोप
Edited by: उमेश बुचडे
Published on: August 23, 2023 13:37 PM
views 534  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनखात्यातील एका अधिकाऱ्याचा गलथान कारभार समोर आला आहे. कणकवली तालुक्यातील वनपाल भिरवंडे या पदावर कार्यरत असलेल्या सत्यवान सुतार यांनी लाकूड वाहतूक परवाना पासवर लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनाचा फोटो लावण्याऐवजी देशातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांचा फोटो लावला असल्याचे माहिती अधिकारातून मिळवलेल्या माहिती मधून समोर आलीय. दरम्यान याबाबत उपवनसंरक्षक सावंतवाडी यांच्याकडे तक्रार करूनही अद्यापही संबंधित अधिकाऱ्याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नसून उपवनसंरक्षक हे या अधिकाऱ्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी केला आहे.


दरम्यान, विवेक ताम्हणकर यांनी उपवनसंरक्षक सावंतवाडी यांना रीतसर पत्र देऊन संबंधित अधिकाऱ्याला आपण पाठीशी घालत असून आता लोकशाही मार्गाने या भ्रष्ट कारभाराविरोधात आम्ही दाद मागणार असल्याचा इशारा दिला आहे. उपवनसंरक्षक सावंतवाडी यांना दिलेल्या पत्रात आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी म्हटले आहे की, कणकवली तालुक्यातील वनपाल भिरवंडे या पदावर काम करणारे सत्यवान अनंत सुतार हे जंगली लाकूड वाहतूक परवाना पास देताना त्या पास मध्ये फेरफार करत असल्याचे समोर आले होते. मी स्वतः माहिती अधिकारात माहिती मिळवून याबाबतची तक्रार आपल्याकडे केली होती. या तक्रारीनुसार आपल्या स्तरावरून संबंधित अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी देखील झाली होती.


वाहन क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेचे पास देणे, सदर पासची सॉ मिलवर नोंद नसणे यासोबतच एका पास मध्ये लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या फोटो ऐवजी देशातील नामवंत सामाजिक कार्यकर्त्या सन्माननीय मेधाताई पाटकर यांचा फोटो लावण्यात आलेला आहे. सामाजिक कार्यातील आमच्या मार्गदर्शक मेधाताई पाटकर या सन्माननीय व्यक्तीचा फोटो वापरून आपल्या संबंधित अधिकाऱ्याकडून किंबहुना वन खात्याच्या सिंधुदुर्ग विभागाकडून त्यांचा अवमान करतानाच त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम करण्यात आलेले आहे. सन्माननीय मेधा पाटकर यांच्याशी लवकरच याबाबत चर्चा करून आम्ही वरिष्ठ स्तरावर याची तक्रार करण्याचे ठरविले आहे.


दरम्यान, एवढी मोठी बाब आपल्या अधिकार क्षेत्राखालील अधिकाऱ्याकडून घडलेली असताना आपण जाणीवपूर्वक या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. सदर अधिकाऱ्याच्या गलथान आणि भ्रष्ट कारभाराबाबत आपल्याकडे वारंवार तक्रार आणि पाठपुरावा करून देखील आपल्याकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही, उलट पक्षी या अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचे काम आपल्याकडून केले जात आहेत. त्यामुळे आता लोकशाही मार्गाने या भ्रष्ट कारभाराबाबत आवाज उठविण्याचे काम आम्ही आम आदमी पक्षाच्या माध्यमातून करत आहोत. 


दरम्यान ताम्हणकर यांनी वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेचे वाहतूक पाच कसे काय दिले गेले याकडे देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.