
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजश्री शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेच्या जिल्हास्तरीय समितीवर दशावतारी हार्मोनियम वादक आणि 'भाव अंतरीचे हळवे' फेम गवळीरत्न महेंद्र एकनाथ उर्फ मयूर गवळी यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस तसेच जिल्हा बँक संचालक महेश सारंग आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या हस्ते गवळी यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बांदा मंडळ सरचिटणीस मधू देसाई, दोडामार्ग मंडळ सरचिटणीस आनंद तळवणकर, बांदा माजी उपसरपंच बाळू सावंत, कोलगाव माजी सरपंच अनिल नाईक, कारिवडे पोलिस पाटील प्रदीप केळुसकर, अण्णा केळुसकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मयूर गवळी हे ज्येष्ठ हार्मोनियम वादक असून त्यांनी आतापर्यंत अनेक दशावतार नाट्यमंडळांमधून हार्मोनियम वादन केले आहे. कारिवडे येथील हेळेकर दशावतार नाट्यमंडळातून त्यांनी आपल्या कलेची सुरुवात केली होती. भावअंतरीचे हळवे या लंगार गीताच्या गायनानंतर ते अतिशय लोकप्रिय ठरले होते. त्यांचे अनेक लंगार गीते त्यानंतर प्रसिद्ध झाली आहेत.
नुकताच कास येथील श्री महालक्ष्मी मंदिराचा शतक महोत्सव संपन्न झाला. यावेळी ख्यातनाम गायक पंडित अजित कडकडे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पंडीत अजित कडकडे यांनी तुझे नाम आले ओठी हा अभंग सादर केला. यावेळी याच अभंगातील शेवटच्या चरणातील भाव अंतरीचे हळवे या लंगार गीताचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले. तुझे नाम आले ओठी हा अभंग राज्यभरात जितका प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे याच अभंगातील भावअंतरीचे हळवे हा चरण लंगर गीतातून मयूर गवळी यांनी प्रसिद्ध केला. त्यांचे कौतुक करावे तितके थोडे अशा शब्दात त्यांनी मयूर गवळी यांचे तोंड भरून कौतुक केले होते.
मयूर गवळी यांची राजश्री शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना समितीवर झालेली निवड योग्यच असून त्यांच्या माध्यमातून अनेक दशावतार तसेच इतर क्षेत्रातील कलावंत यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत असून या निवडी बद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.