
देवगड : साक्षी प्रभू यांच्या नावे प्रसिद्ध केलेल्या निवेदनावर साक्षी प्रभू यांची सही होती का? प्रसिद्धी पत्रक परस्पर काढून पत्रकारांना दिले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कोणतेही पत्र तयार केले तर त्याच्याखाली आमची सही लागते. मात्र या पत्राखाली प्रभू यांची सही नाही. तशीच अनेक कागदपत्रांवर नगराध्यक्षांची सही आहे, ही कागदपत्रे मी भविष्यात जाहीर करेन. मात्र त्याला जबाबदार नगराध्यक्ष असतील. यामुळे साक्षी प्रभू यांचा राजकीय बळी दिला जातोय, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी देवगड येथील पत्रकार परिषदेत केला. आमदार नितेश राणे आमदार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी पत्रकार परिषदेला देवगड - जामसंडे नगरपंचायतीचे भाजपाचे गटनेते शरद ठुकरुल, भाजपा पदाधिकारी बाळ खडपे, संदीप साटम, दया पाटील, योगेश चांदोसकर आदी उपस्थित होते.
यावेळी साक्षी प्रभू यांची सही कुठे कुठे, कशी वापरली गेली? याची माहिती माझ्याकडे आहे. यामुळे त्यांचा राजकीय बळी कोण घेऊ पाहतोय का? असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी यावेळी केला. काही टेंडर आहेत, काही योजना आहेत. यावर तुम्हालाच विश्वासात घेऊन सह्या केल्यात का? याचे उत्तर जनतेला नगराध्यक्षांनी द्यावे. पुढील काळात मी काही अशी कागदपत्रे जाहीर करणार आहे की, त्याला नगराध्यक्षच मॅडम जबाबदार असतील आणि त्याच अडचणीत येऊ शकतात, असेही आम. राणे म्हणाले.