नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी अनेक विकास कामांची केली भूमिपूजन

Edited by:
Published on: March 12, 2024 14:40 PM
views 173  views

दोडामार्ग : कसई- दोडामार्ग शहराची गतिमान विकासाकडे वाटचाल सुरू असताना पुन्हा एकदा नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी एकाच वेळी अनेक विकास कामांची भूमिपूजन व लोकार्पण केली आहेत. गेल्या दोनच वर्षात त्यांनी नगराध्यक्ष म्हणून शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे आणून शहराच्या विकासाचा आलेख उंचावता ठेवला आहे. सोमवारीही शहरातील पंचशीलनगर येथील  समाजमंदिरासह विविध  विकासकामांचे भूमिपूजन त्यांनी व त्यांच्या टीमने केले. 

शहराचा विकास हाच आमच्या संपूर्ण टीमचा ध्यास असून आम्ही दिलेला शब्द पूर्ण करून दाखवतो. ही तर सुरवात आहे आगामी काळात हे शहर अधिक गतिमान विकासाने समृध्द असेल, असे सूचक विधान करीत त्यांनी शहर विकासाचे आपले व्हिजन स्पष्ट केलय. कसई - दोडामार्ग नगरपंचायत क्षेत्रात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. विशेषकरून नगरपंचायतीवर नगराध्यक्ष म्हणून चेतन चव्हाण विराजमान झाल्यानंतर गेल्या वर्षभरात त्यांनी शहराच्या विकासासाठी तब्बल १९ कोटी रुपयांचा निधी आणला. नगरोथान विकास निधी, जिल्हा नियोजन तसेच आमदार व खासदार फंड आदींच्या माध्यमातून त्यांनी विविध विकासकामे शहरात मंजूर करून आणली. शहरातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण, पक्के काँक्रीटचे गटार , साकव, स्ट्रीटलाईट, तलाव सुशोभकरण, बंधारे, समाजमंदिर, हायमास्ट आदी विकास कामांचं यात सामावेश आहे. सध्या यातील बरीचशी कामे सुरू असून पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण व मंजूर कामांचे भूमिपूजन सोमवारी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष देविदास गवस , शिक्षण व आरोग्य सभापती सौ.गौरी पार्सेकर , बांधकाम सभापती नितीन मणेरीकर ,महिला व बालकल्याण सभापती सौ.ज्योती रमाकांत जाधव ,नगरसेविका क्रांती जाधव , सुकन्या पनवेलकर ,सौ.स्वराली गवस , सौ.संजना म्हावळणकर , सौ.वासंती मयेकर , नगरसेवक रामचंद्र मणेरीकर , प्रा.संजय खडपकर , रामचंद्र ठाकूर , ग्रामस्थ समीर रेडकर , स्वप्नील गवस , सुमित म्हाडगूत , बाबू मयेकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी शहराच्या विकासाच्याबाबतीत असलेले आपले धोरण स्पष्ट केले .शहराच्या विकासासाठी मी व माझी टीम सदैव प्रयत्नरत राहू शिवाय माझ्या शहरातील प्रत्येक शहरवासीयाने पाहिलेल्या स्वप्नवत दोडामार्गच्या स्वप्नपूर्ती साठी विकासनिधी आणण्यासाठी प्रयत्न करू .आता वर्षभरात आणलेला १९ कोटींचा निधी हा तर फक्त ट्रेलर आहे आगे - आगे देखो होता है क्या ? असे सूचक विधान करीत येणाऱ्या काळात विकासकामांसाठी आणखिन निधी आणणार असल्याचे संकेत दिले.

पंचशील नगर येथील समाज मंदिर मैदानाजवळील मोकळ्या जागेत बांधण्याचे नियोजित होते. मात्र याची कुणकुण शहरवासीयांना लागताच क्रीडाप्रेमी व नागरिकांनी येऊन समाजमंदिर मोकळ्या जागेत बांधल्यास मैदान उरणार नाही त्यामुळे ते त्याठिकाणी बांधू नये असे सांगितले. त्यावर नगराध्यक्ष चव्हाण यांनी समाजमंदिर बांधणे गरजेचेच आहे पण त्याची जागा तुम्हीच ठरवा ; तुम्ही सांगाल तिथे ते बांधू असे सांगून समाजमंदिर जागेचा निर्णय शहरवासीयांच्याच कोर्टात टाकला. अखेर नागरिकांनीच मैदानाच्या एका टोकाला जुन्या समाजमंदिराच्या जागेत २ गुंठ्यांतच समाज मंदिर बांधा असे सुचविले. त्याला चव्हाण यांनी संमती दिली आणि लागलीच भूमिपूजनही केले.

यावेळी उपनगराध्यक्ष देविदास गवस , शिक्षण व आरोग्य सभापती सौ.गौरी पार्सेकर , बांधकाम सभापती नितीन मणेरीकर ,महिला व बालकल्याण सभापती सौ.ज्योती रमाकांत जाधव ,नगरसेविका क्रांती जाधव , सुकन्या पनवेलकर ,सौ.स्वराली गवस , सौ.संजना म्हावळणकर , सौ.वासंती मयेकर , नगरसेवक रामचंद्र मणेरीकर , प्रा.संजय खडपकर , रामचंद्र ठाकूर , ग्रामस्थ समीर रेडकर , स्वप्नील गवस , सुमित म्हाडगूत , बाबू मयेकर आदी उपस्थित होते.