
दोडामार्ग : अधिकारी आणि कर्मचारी पदे रिक्त ठेवून शासन नेमक करतंय काय? आम्ही पदाधीकारी म्हणून जनतेच्या कामांना न्याय द्यायचा तरी कसा? कारभार हाकण्यासाठी यंत्रणाच कार्यान्वित नसेल आणि काम करणारे अधिकारीच नसतील तर कारभार चालवायचा तरी कसा? जनतेच्या कामांचा निपटारा करायचं कसा ? नव्हे तर करोडांचा येऊन पडलेला निधी खर्च करायचा तरी कसा? असे सवाल कुणा सर्वसामान्य नागरिकांना पडलेले नाहीत. तर हे सवाल उपस्थित केलेत कसई - दोडामार्ग नगरपंचायतचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांना. आज याच प्रश्नी त्यांनी थेट पत्रकार परिषदेचे आयोजन करून आपल्या मनातील खदखद व्यक्त केलीय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवख्या दोडामार्ग तालुक्यात कसई-दोडामार्ग नगरपंचायतीत मुख्याधिकारी, प्रशासकीय अधिकारी, नगरपंचायत अभियंता, लेखापाल व कर निरीक्षक ही प्रमुख ५ ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे नगरपंचायतचा कारभार चालवायचा तरी कसा? जनतेची कामे वेळेत उरकायची कशी ? आणि विकास कामांसाठी आणलेला भरमसाठ निधी खर्च करायचा तरी कसा ? या प्रश्नांनी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांना हैराण केलंय. या नगरपंचायतीत अवघ्या आठ वर्षात चौदा मुख्याधिकारी बदलून गेलेत. तर गेले नऊ महिने हा कारभार वेंगुर्ल्याचे मुख्याधिकारी पाहत आहेत. या अनुषंगाने शुक्रवारी विद्यमान नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन शासनाच्या अधिकारी व कर्मचारी न देण्याच्या धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, विकास कामांसाठी नगर पंचायत ला कोट्यवधींचा निधी आला असून ही कामे टप्प्याटप्प्याने सुरू आहेत. मात्र अधिकारीच नसल्याने कामांचे प्रशासकीय कामकाज करताना प्रचंड अडथळा येत आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ याकडे लक्ष देऊन ही रिक्त पदे भरावीत अशी मागणी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केली आहे.
१९ मार्च २०१५ साली नगरपंचायतची स्थापना झाली. या आठ वर्षांच्या कालावधीत १५ मुख्याधिकारी लाभले. सध्या वेंगुर्लेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे येथील नगरपंचायतीचा प्रभारी कार्यभार आहे. तर दोनच दिवसांपूर्वी दोडामार्ग नगरपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या प्रशासकीय अधिकारी यांचीही बदली झाली आहे. या व्यतिरिक्त नगरपंचायत अभियंता, कर निरीक्षक, लेखापाल ही अत्यंत महत्त्वाची पदे गेल्या कित्येक वर्षापासून रिक्तच आहेत. आम्ही कारभार हाती घेतल्यापासून आम्ही सर्व पदाधिकारी व सहकारी नगरसेवक नगरपंचायतचा नियोजनबद्ध विकास आराखडा बनवत आहोत. मात्र आमच्या या कामांना प्रशासकीय अधिकारी यांची जोड न मिळाल्यास शहराचा विकास होणार तरी कसा? तसेच जनतेची कामे होणार तरी कशी हा प्रश्न आहे. आज छोटी मोठी कामेही वेळेत होत नसल्याने जनतेचा रोष नाहक आमच्यावर व्यक्त होत आहे. त्यामुळे ही सर्व पदे तात्काळ भरण्यात यावीत याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधलं.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून भरमसाठ निधी विकास कामांसाठी प्राप्त झाला आहे. शिवाय शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू असून नगरपंचायत मध्ये अधिकाऱ्यांची कमतरता असेल तर शासनाच्या योजना जनतेर्यंत पोहचणार तरी कशा? आणि आलेला विकास निधी खर्च होणार तरी कसा ? असा सवाल देखील नगराध्यक्ष चव्हाण यांनी यावेळी उपस्थित करत आपण याप्रश्नी या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही लक्ष असल्याचे चेतन चव्हाण यांनी सांगितला आहे.