
सिंधुदुर्गनगरी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख म्हणून मायनाक भंडारी यांचे नाव इतिहासात नोंदवले आहे. त्यांनी अनेक पराक्रम घडवले आहेत. त्यांचे हे कार्य आणि त्यांचा इतिहास भावी पिढीपर्यंत पोहचविणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृहाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दिपक केसरकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, जिल्हा बँकेच अध्यक्ष मनीष दळवी, प्रभाकर सावंत तसेच मायनाक भंडारी यांचे वारस देखील यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, मायनाक भंडारी यांचे शौर्य अतुलनीय असे आहे. या सभागृहाला त्यांचे नाव देऊन त्यांच्या पराक्रमाचा सन्मान करण्याचा आमचा प्रयत्न आहे. छत्रपती शिवरायांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' म्हणून ओळखले जाते. त्यांना हे नाव मिळवून देण्यामध्ये मायनाक भंडारीजींसारख्या असंख्य मावळ्यांचे, सहकाऱ्यांचे फार मोठे योगदान आहे, हे आपणाला विसरुन चालणार नाही. मायनाक भंडारी यांचे एकंदरीत कार्य आणि त्यांनी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी जो इतिहास घडवला, मान मिळवला हे जेव्हा अभ्यासले तेव्हा मलाही असे वाटले, की मायनाक भंडारी यांचा पूर्ण इतिहास भावी पिढीपर्यंत घेऊन जाण्याचे काम माझ्या सारख्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी केलेच पाहिजे म्हणून आम्ही या सभागृहाला त्यांचे नाव दिले. सभागृहाला त्यांचे नाव देण्यामागचा हेतू एवढाच होता, की जेव्हा या सभागृहाचे नाव घेतले जाईल तेव्हा मायनाक भंडारींची आठवण, त्यांचा इतिहास, आणि त्यांचा उल्लेख, हा प्रत्येकाच्या तोंडी आलाच पाहिजे, ही भूमिका त्यामागे आहे. भंडारी समाजासाठी त्यांच्या हक्काचे ‘भंडारी भवन’ बांधण्याचा आमचा मानस आहे. आपल्याला ज्यांचा सदैव गर्व आहे, ज्यांचे नाव आपल्या प्रत्येकांच्या मनामनात आहे असे ज्येष्ठ रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी यांच्या कार्याचा देखील योग्य पद्धतीने सन्मान करण्याची जबाबदारी निश्चितपणे आमची असेल असेही ते म्हणाले.
आमदार दिपक केसरकर म्हणाले की, मायनाक भंडारी यांनी स्वराज्य रक्षणासाठी अनेक लढाया लढल्या आणि त्या जिंकल्या देखील. त्यांचे हे शौर्य भावी पिढीसमोर येणे आवश्यक आहे. या सभागृहाच्या माध्यमातून त्यांच्या पराक्रमाची गाथा नक्कीच सर्वांसमोर येईल असेही ते म्हणाले.
या प्रसंगी आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांच्या वंशजांचा गौरव पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला.