
सिंधुदुर्ग : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गेले दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भेटीवर होते. भेटी दरम्यान काल (२६ नोव्हेबर) रोजी त्यांनी सावंतवाडी येथे विविध ओबीसी समाज बांधव प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला. सदर संवादादरम्यान मच्छीमार समाजाचे नेते वसंत तांडेल, रविकिरण तोरसकर, भूषण सारंग यांनी मच्छीमार समाजाला भेडसावणाऱ्या समस्या बाबत चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने परप्रांतीय हाय स्पीड ट्रॉलरचे अतिक्रमण, मासेमारी कायद्याची अंमलबजावणी, गाबित समाज बांधवांना जातीचे दाखले मिळण्याकरिता येणाऱ्या अडचणी व ईतर विषयाकडे लक्ष वेधले. आपण सदर विषयात राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
शासन दरबारी मत्स्य उत्पादनवाढीसाठी योग्य पाठपुरावा करावा जेणेकरुन मच्छीमारांच्या टोपलीत मासे सदैव भरलेले राहतील,असे साकडे, भेटवस्तू म्हणून 'लाकडी मासा व वेताची टोपली' देऊन चंद्रशेखर बावनकुळे यांना घालण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य निशांत तोरसकर, बाळू देसाई, विकी केरकर, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सावंतवाडी मा. नगराध्यक्ष संजू परब जिल्हाध्यक्ष राजन तेली व इतर मान्यवर उपस्थित होते.