
कणकवली : नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडद बोर्डवे, संचालित प्राथमिक आश्रमशाळा बोर्डवे येथे पालक पाद्यपूजा, बक्षीस वितरण व स्नेहसंमेलन सोहळा नुकताच संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्येची माता शारदा देवी व शिवछत्रपती महाराज यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रूपेश पाटील, समाज कल्याण निरीक्षक श्री. श्रीमनवार, बोर्डवे सरपंच वेदांगी पाताडे, संस्थेचे सचिव सदानंद गोसावी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मोडक, उपाध्यक्षा प्रतिमा जाधव, संचालिका उमिला ज. गोसावी, संचालक संदीप गोसावी, सुशील गोसावी, माजी खजिनदार चंद्रसेन गोसावी, शंकर गोसावी, रुपाली गोसावी, संतोष तेली, प्रवीण मोरे, समस्त पालक वर्ग, माजी विद्यार्थी उपस्थित होते.
प्रारंभी दीपप्रज्वलन झाल्यावर विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. सर्व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक आनंद कर्पे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मुख्याध्यापक कर्पे यांनी प्रास्ताविक केले.
पालकांच्या पाद्यपूजेने सारेच झाले भावूक
यावेळी संपूर्ण सिंधुदुर्ग व बाहेरून आलेल्या पालकांची आश्रमशाळेतील मुलांनी मनोभावे पाद्यपूजा केली. मुलांनी पालकांना वंदन करून, पाय धुवून पाद्य पूजा करून आरती ओवाळली. हा कार्यक्रम अत्यंत भावूक होता. अनेक दिवसांनी भेटायला दूरवरून आलेले पालकांची भेट त्यात त्यांची पाद्यपूजा नकळत पालकांच्या डोळ्यांतील पाणी आणि मुलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रु आई-बापावरचे प्रेम दाखवून देत घेते. हे सारे पाहून उपस्थितांचेही डोळे आपसूक पाणावले.
दरम्यान, आश्रमशाळेत राबविलेल्या विविध स्पर्धा, निबंध, वक्तृत्व, चित्रकला, क्रीडा स्पर्धा सांघिक, वैयक्तिक, ज्ञानी मी होणार, गीत गायन स्पर्धा यामध्ये प्रावीण्य मिळविलेल्या आदर्श मुलांना वस्तू स्वरुपात, सांघिक खेळाला ट्रॉफी, प्रशस्तीपत्रक
मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यानंतर मान्यवरांनी मुलांनाना अमृततुल्य मार्गदर्शन केले.
प्रमुख मार्गदर्शक प्रा. रूपेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मराठी शाळेचे महत्त्व सांगून पाद्यपूजा कार्यक्रम पाहून आपण भावूक झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुलांना संस्कार घडविणारी पुस्तके देण्याची ग्वाही देत आगामी काळात शाळेला सहकार्य करण्याबाबत तत्पर असल्याचे सांगितले.
उर्मिला गोसावी यांनीही आश्रमशाळेची वाटचाल प्रगतीशील असल्याचे नमूद करून मुलांना शुभेच्छा दिल्या. सरपंच वेदांगी पाताडे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. इतर मान्यवरांनीही शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भालचंद्र गोसावी यांनी मुलांना त्यांच्या कलागुणात मिळविलेल्या यशाचे कौतुक करत अभिनंदन केले. तसेच शाळेत राबवित असलेल्या उपक्रमाचेही कौतुक केले. पालकांना पुढील वर्षी पटसंख्या वाढीसाठी सर्वांनी एकत्रित अधिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
आश्रमशाळेत चालवित असलेल्या विविध उपक्रमांचे अहवाल वाचन वैशाली गोसावी यांनी केले. या कार्यक्रमात आश्रमशाळा अधीक्षीका उषा गोसावी, स्वयंपाकी रूपेश यादव, श्री. गोसावी तसेच आशा घाडी, कामाठी प्रकाश गोसावी यांनी उत्तम सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. पालव यांनी केले तर आभार प्रदर्शन उदय नाईक यांनी केले.