
वेंगुर्ला : तालुक्यातील मातोंड भोम येथे अज्ञात चोरट्यानी बंद घर फोडून घरातील सामान, देवघरातील समान व मूर्ती सहित विविध सुमारे २१ हजार किमतीच्या वस्तूंची चोरी केली. याबाबत अपूर्वा अरविंद वाटवे (४१) मूळ मातोंड गंडाचीराई येथील रहिवासी व कामानिमित्त राहणार नासनोडा वांयगणवाडा हळदोणा बारदेश, गोवा यांनी वेंगुर्ला पोलिसात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाटावे कुटुंबियांनी सुखवस्ती साठी मातोंड भोम येथे घर बांधले आहे. ते अधून मधून त्याठिकाणी येत जात असतात. दरम्यान सौ अपूर्वा वाटावे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ४ वा. ते दि. ६ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वा.च्या दरम्याने कोणीतरी अज्ञात चोरट्याने वाटावे यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी कोयंड्याचे स्क्रू अलगद काढून कुलूप न तोडता घरात प्रवेश करून चोरी केली.
यात चोरट्यानी घरातील सामान, देवघरातील देवाचे सामान व देवाची गणपतीची चांदीची मूर्ती, बाथरूम मधील नळ, जॅक, वॉश बेसिन, घरातील भिंतीचे घड्याळ, टेबल फॅन, रिकामी सिलिंडर, कराओके माईक स्पीकर असे मिळून सुमारे 21,600/-रुपये किमतीच्या वस्तू चोरल्या असल्याची तक्रार केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रंजिता चौहान करत आहेत.