
वेंगुर्ला : ग्रामीण भागातील शाळा या शिक्षणाचा पाया असतो. त्यामुळे अशा शाळांमधून शिक्षण घेतलेली मुले पुढे संस्कारक्षम बनतात. मातोंड येथील नं १ शाळेला आज १२० वर्षे पूर्ण झाली. या शाळेने हजारो विद्यार्थी घडवले आहे. या शाळेच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी मदत करण्यास मी तयार आहे. तसेच वरिष्ठ स्तरावरून शाळेच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले जातील. असे आश्वासन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी मातोंड येथे बोलताना दिले.
मातोंड येथील श्री देव रवळनाथ विद्यामंदिर शाळा नं १ ला १२० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या शाळेचा वर्धापनदिन सोहळा थाटात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्ह्णून उपस्थित असलेले जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी बोलत होते. यावेळी मातोंड उपसरपंच आंनद परब, ग्रामपंचायत सदस्य राहुल प्रभू, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंद मातोंडकर, सामाजिक कार्यकर्ते बाळा मोहिते, शिक्षक पालक संघ अध्यक्ष देवदास परब, पालक सदस्य रामा नेमण, माजी अध्यक्ष सत्यवान गवंडे, विठ्ठल गवंडे व माजी विध्यार्थी आदी उपस्थित होते.
या वर्धापनदिन निमित्त शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेमध्ये घेण्यात आलेला विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुलांच्या उपस्थितीत केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर भास्कर वैद्य पुरस्कृत जय संतोषी माता नाट्य मंडळ पेंडूर यांचा कृष्ण कवच हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपेश परब यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी मुख्याध्यापक अलका कांबळे यांच्या सहित सर्व पालकवर्ग, शाळा व्यवस्थापन समिती यांनी परिश्रम घेतले. माजी विद्यार्थ्यांचे या कार्यक्रमासाठी मोठे योगदान ठरले.