
सिंधुदुर्गनगरी : कुडाळ तालुक्यातील तुळसुली तर्फ माणगाव ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांनी आपल्या कामकाजात दिरंगाई केली व ग्रामपंचायत साहित्य खरेदी दरपत्रक न मागविता बाजारी दरापेक्षा जादा दराने काही साहित्य खरेदी केल्याचा संशय येथील ग्रामस्थानी व्यक्त केला असून याबाबत चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
सन २०२२-२३ व सन २०२३-२४ लेखा परीक्षण अहवाल आर्थिक वर्षाच्या पहिल्या ग्रामसभे मध्ये ठेवणे बंधन कारक होते. परंतु सरपंच व ग्रामसेवक यांनी आज पर्यंत तो अहवाल ग्रामसभेमध्ये ठेवला नाही. सरपंच व ग्रामसेवक यांनी २०२३-२४ व २०२४-२५ या आर्थिक वर्षात केलेली स्ट्रीट लाईट खरेदी, चष्मा खरेदी इत्यादी साहित्य खरेदी संशयास्पद असून ती बाजार भावा पेक्षा जादा दराने खरेदी केल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच नमुना नंबर १५ रजिस्टर नुसार साठा व पुरवठा याचा तपशील जुळत नाही याकडे लक्ष वेधले आहे. ग्रामपंचायत अधिनियमानुसार ग्रामनिधी पैकी १०% निधी हा महिला व बालकल्याण साठी खर्च करणे अपेक्षित होते. परंतु ग्रामपंचायतीने जाणून बुजून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात हा खर्च केलेला नाही असा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान संशयास्पद सर्व बाबींची चौकशी करावी अशी मागणी ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांच्याकडे केली आहे. यावेळी विजय वारंग, हरिश्चंद्र माइणकर, प्रशांत तुळसुलकर, गंगाराम वारंग, महेश वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.