मासळी मंडळी लगतच्या शौचालयाच्या टाक्यांची उंची वाढवावी

ठाकरे गटाने वेधलं लक्ष
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: August 10, 2023 12:23 PM
views 90  views

मालवण : शहरातील मासळी मंडळी लगत असलेल्या पालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या टाक्या कमी उंचीच्या असून त्यातील पाणी मासळी लिलावाच्या ठिकाणी जात असल्याने या भागात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे या टाक्यांची उंची वाढवावी यासाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. 

शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार ओरसकर, दीपक कदम, बबन वाघ, सिद्धेश मांजरेकर, उमेश चव्हाण या पदाधिकाऱ्यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी जात पाहणी केली. यावेळी शौचालयाच्या टाक्या या कमी उंचीच्या असल्याने पावसाचे पाणी या टाक्यांमध्ये जात आहे. परिणामी हे सर्व दुर्गंधीयुक्त पाणी मासळी लिलावाच्या ठिकाणी पसरत असल्याने मत्स्यविक्रेत्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी शौचालयांच्या टाक्यांची उंची वाढविणे गरजेचे बनले आहे. त्यादृष्टीने ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधत याबाबतची कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.