
देवगड : मागील २४ वर्षांच्या शैक्षणिक स्थितीचा अभ्यास पाहता अतिशय कठीण परिस्थितीत संस्थेने मराठी माध्यमाची शाळा सुरू करण्याचे कार्य केले हे खरोखरच कौतुकास्पद आहे. गेली २४ वर्षे ही संस्था विनाअनुदान तत्त्वावर अतिशय गुणवान विद्यार्थी घडवीत आहेत, विद्यार्थ्यांना उत्तम दर्जेदार शिक्षण देत आहे.यासाठी या शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदानही मोठे आहे,असे विचार मोरेश्वर गोगटे विद्यामंदिर, जामसंडेचे माजी मुख्याध्यापक अरुण सोमण यांनी शाळेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याच्या शुभारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मांडले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक व दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित, रोप्यमहोत्सवी समितीचे अध्यक्ष सदानंद पवार, स्थानीय समिती अध्यक्ष डॉ.के.एन.बोरफळकर, कार्यवाह अॅड.अविनाश माणगावकर, दत्तात्रय जोशी अर्चना नेने, डॉ. पुष्कर आपटे, मिलिंद कुबल, अनुश्री पारकर, चंद्रकांत शिंगाडे, संजीव राऊत, मुख्याध्यापक महादेव घोलराखे आदी उपस्थित होते.
सुरुवातीस दीक्षित यांच्या हस्ते रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.पवार यांनी आपण दिलेल्या देणगीचे आज खऱ्या अर्थाने सार्थक झाले असून मी समाधानी आहे.या शाळेतील सर्व शिक्षक उपक्रमशील असल्यामुळे या शाळेची उत्तरोत्तर प्रगती होत असल्याचे म्हणाले.
सुरुवातीस कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना नेने यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार स्वप्नील सुतार यांनी केले. याप्रसंगी शाळेच्या गेल्या २४ वर्षांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणारी ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. शैक्षणिक विकास व्हावयाचा असेल तर पालक, विद्यार्थी, संस्था, शिक्षक यांचे सहकार्य हवे. शिक्षकांनी उत्तम शिक्षक बनून ज्ञानदान करावे,विद्यार्थ्यांनी समाजात घडणाऱ्या गोष्टींतून ज्ञान घ्यावे. तरच उत्तम शिक्षण मिळू शकेल असे सोमण म्हणाले.