
मालवण : वायरी भूतनाथ गावचे नवनिर्वाचित सरपंच भगवान लुडबे यांनी गुरुवारी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देत तेथील समस्यांचा आढावा घेतला. सिंधुदुर्ग किल्यावर नादुरुस्त प्रसाधन गृह, प्लास्टिक कचरा, वाढलेली झाडी झुडपे आदी समस्या निर्माण झाल्या होत्या. सिंधुदुर्ग किल्यावर नियमित स्वच्छतेबाबत व अन्य समस्या तात्काळ दूर करण्यासंदर्भात लुडबे यांनी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.
शासनाच्या आदेशाने सिंधुदुर्ग किल्यावर पर्यटकांकडून अभ्यागत कर वसूल केला जातो. परंतु हा कर वसूल करत असताना अनेकदा पर्यटक हुल्लडबाजी करतात. अनेकदा किल्यावर आलेले पर्यटक अभ्यागत कर देण्यास ग्रा.प. कर्मचाऱ्यांना नकार देतात. यातून ग्रामपंचायत कर्मचारी व पर्यटकांमध्ये अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवत असल्याची तक्रार वसुली कर्मचााऱ्यानी केली होती. यातून ग्रामपंचायतीचे नुकसान होऊ नये यासाठी लवकरच तोडगा काढण्यात येणार असल्याचे सरपंच लुडबे म्हणाले.
बंदर जेटी येथे ज्याप्रमाणे मेरीटाईम बोर्डाच्या अखत्यारीत किल्ले प्रवासी होडी वाहतुकीची तिकिट वसुली केली जाते, त्याच ठिकाणी एक खिडकी द्वारे किल्ले प्रवासी होडी वाहतुकीची आणि अभ्यागत कराची तिकीट काढली जावीत अशी मागणी अनेकांनी केली आहे. मागील काही वर्षांपासून सिंधुदुर्ग किल्यावर अभ्यागत कर वसूल केला जात आहे. या करातून मिळणाऱ्या निधीचा विनियोग सिंधुदुर्ग किल्यावर पर्यटकांसाठी सोयी सुविधा पुरविण्यासाठी तसेच स्वच्छते साठी केला जातो. याठिकाणी ग्रामपंचायतीने चार कर्मचारी नियुक्त केले आहेत. हे कर्मचारी येथील स्वच्छता आणि कर वसुलीचे काम करतात.
सरपंच लुडबे यांनी पदभार स्वीकारल्या नंतर प्राधान्याने सिंधुदुर्ग किल्ल्यावरील झाडी झुडपाच्या साफसफाईला सुरुवात केली. गुरुवारी स्वतः सरपंच भगवान लुडबे यांनी कर्मचाऱ्यांसोबत किल्यावर जात साफसफाईच्या कामाला हात घातला. सिंधुदुर्ग किल्यावर महिला व पुरुष प्रसाधन गृहाची व्यवस्था आहे. या ठिकाणी पर्यटकांना स्वच्छता आणि सुरक्षितते संदर्भात अजूनही चांगल्या सुविधा पुरविण्याची पर्यटकांची मागणी होती. सरपंच लुडबे यांनी या ठिकाणच्या समस्यांची पाहणी करून प्राथमिक स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध करू दिल्या.
अभ्यागत कर वसुलीची यंत्रणा सुरळीत नसल्यामुळे ग्रा. प. चे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. स्वछतागृहांचे अद्ययावतीकरण करणे, सिंधुदुर्ग किल्याला दर दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असल्यामुळे याठिकाणी तितक्याच प्रमाणात प्लास्टिक व तत्सम कचऱ्याची निर्मिती होत असते. या कचऱ्याची विल्हेवाट व दर दिवशी कचरा उचलला जावा यासाठी व्यवस्थापन करणे. किल्यावर मोठ्याप्रमाणात वाढणारी झाडी झुडपे, आणि गाळाने भरलेल्या विहिरी अशा एक ना अनेक समस्या आमच्या पुढे आहेत. आम्ही या सर्व समस्यांवर तोडगा काढू, असे सरपंच भगवान लुडबे म्हणाले. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीवरून झाडी झुडपे काढण्याचे पन्नास टक्के काम पूर्ण झाले आहे. पुरातत्व विभागाने दोन कर्मचारी यासाठी नेमले आहेत. काही ठिकाणीं हे काम जिकिरीचे असे आहे. तरीही लवकरात लवकर तटबंदीवरील झाडी कडून टाकण्याचे काम पूर्ण करू - वैभव बेटकर, एमटीएस, पुरातत्व विभाग किल्लेदार. फोटो. गुरुवारी वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देत किल्ल्यावरील स्वच्छता आणि अभ्यागत करा संदर्भात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.