मराठा समाजाला पात्रता असूनही मागे राहावे लागतेय : बाळा जाधव

Edited by: विनायक गावस
Published on: November 03, 2023 18:38 PM
views 140  views

सावंतवाडी : मराठा समाजाला प्रत्येक क्षेत्रात पात्रता असूनही मागे राहावे लागत आहे अशी चिंता व्यक्त करत नारायण उर्फ बाळा जाधव यांनी केंद्र सरकारच्या घरकुल योजना प्रस्तावापासून वंचित राहावे लागत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, शिक्षण, उद्योग, नोकरी अशा क्षेत्रात मराठा समाजाकडे पात्रता असूनही डावलले जाते. आता घरकुल योजनेत मराठा लाभार्थींना नाकारले जात आहे असे सांगितले.

श्री देव सिध्देश्वर मंदिरामध्ये मराठा समाज बांधवांनी एकत्र येऊन मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविला तसेच भव्य रॅली काढण्याचा निर्णय घेतला. यावेळी सावंतवाडी मराठा समाज अध्यक्ष सिताराम गावडे, अभिमन्यू लोंढे,पुंडलिक दळवी, तळवडे सकल मराठा समाजाचे उत्तम परब, बाळा परब,लवू परब,नारायण उर्फ बाळा जाधव, रवींद्र परब, नारायण परब, विनोद काजरेकर, सुरेश राऊळ, गजानन परब,नाना गावडे, शिवप्रसाद परब, प्रवीण परब, प्रसाद कांडरकर, दत्तात्रय सावंत, गुंडू मालवणकर आणि जवळपास दीडशे समाज बांधव उपस्थित होते.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी नारायण परब म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शांततेच्या मार्गाने आंदोलन छेडले. आता त्यांनी सरकारला दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. याकाळात आपण मराठा समाज बांधवांत जागृती निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न केला पाहिजे. मराठा समाजातील मुलांना आरक्षणामुळे प्रत्येक क्षेत्रात पात्रता असूनही मागे राहावे लागते आहे.

सिताराम गावडे म्हणाले, मराठा समाजावर सारासार अन्याय होत आहे. त्याला जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारून वाट मोकळी करून दिली आहे. त्यामुळे यापुढील काळात समाजातील प्रत्येक बांधवांनी राजकीय पादत्राणे, आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे शांततेच्या मार्गाने लढा दिला पाहिजे. आज नाही तर केव्हाच नाही अशी भूमिका घेतली पाहिजे. मराठा समाजाला प्रत्येक क्षेत्रात पात्रता असूनही डावलले जात आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत जनजागृती व्हावी.तळवडे येथील मराठा समाज बांधवांनी एकत्र येऊन सोमवारी सायंकाळी मोटरसायकल, रिक्षा रॅली काढून मराठा आरक्षणावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.