
सावंतवाडी : आधुनिक युगाशी जुळवून घेत मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सावंतवाडी येथे मराठा व्यावसायिक मेळावा आणि नवीन जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आयोजित करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम येत्या रविवारी १४ सप्टेंबर रोजी, संचयनी पॅलेस, सावंतवाडी येथे होणार आहे. समाजातील तरुणांना योग्य दिशा देण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्गने 'मराठा उद्योजक डिरेक्टरी ॲप' हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून सावंतवाडी तालुक्यातील सर्व व्यावसायिकांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मराठा समाजाने आपल्या तलवारीच्या जोरावर एकेकाळी स्वराज्य स्थापन केले. मात्र, आजच्या बदललेल्या काळात समाजासमोर अनेक नवीन आव्हाने उभी आहेत. पारंपरिक शेतीत होणारा तोटा, वाढती बेरोजगारी, तसेच उद्योगाविषयीच्या अज्ञानामुळे झालेले नुकसान अशा अनेक समस्यांनी मराठा तरुण त्रस्त आहे. अनेक तरुण उपवर असूनही त्यांचे विवाह रखडले आहेत. भविष्यात मोठे सामाजिक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने, समाजाच्या विकासासाठी उद्योजक आणि व्यावसायिकांनी एकत्र येणे काळाची गरज बनली आहे.
या कार्यक्रमादरम्यान भवानी ऑनलाइन सर्विसेस आणि कन्सल्टन्सी या कार्यालयाचे उद्घाटनही केले जाणार आहेत. याठाकाणी उद्योजक आणि तरुणांसाठी विविध सेवा उपलब्ध असतील. उद्योजकांना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज योजना, अनुदान आणि इतर शासकीय योजनांची माहिती दिली जाईल. तसेच, जीएसटी (GST) नोंदणी, विविध प्रकारचे लायसन्स, ई-टेंडर्स आणि इन्कम टॅक्स संबंधित सेवा उपलब्ध असतील. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) योजनेची नोंदणी आणि मार्गदर्शनही दिले जाईल.
विद्यार्थी आणि तरुणांसाठी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि अर्ज भरण्याची सुविधा असेल. होतकरू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके उपलब्ध करून दिली जातील. नवीन नोकरभरतीची माहिती एसएमएस (SMS) आणि व्हॉट्सॲप (WhatsApp) द्वारे दिली जाईल. याशिवाय, एनईई-सीईटी (NEET-CET) नोंदणी आणि प्रवेश नोंदणीची सुविधाही उपलब्ध असेल. विविध शासकीय दाखले आणि इतर सर्व ऑनलाइन सेवा माफक दरात या कार्यालयात मिळतील.
हे कार्यालय मराठा व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी एक हक्काचे केंद्र म्हणून काम करेल. या मेळाव्यासाठी आणि कार्यालय उद्घाटनासाठी तालुक्यामधील सर्व मराठा व्यावसायिक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत, तालुकाध्यक्ष अभिषेक सावंत, आणि जिल्हा संपर्क कार्यालय प्रमुख तथा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष विनय गायकवाड यांनी केले आहे.










