मनीष दळवी यांचा सिंधुदुर्ग बँकेत कौटुंबिक अभिष्टचिंतन सोहळा

Edited by: देवयानी वरसकर
Published on: August 02, 2023 19:25 PM
views 126  views

सिंधुदुर्ग :

आज सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व्यवसायाचा ५००० कोटींचा टप्पा पार पाडत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. कै. भाईसाहेब सावंत, कै. केशवराव राणे साहेब, कै‌. शिवराम भाऊ जाधव साहेब ,कै. डी. बी. ढोलम साहेब या सहकारातील जेष्ठ नेत्यांनी रुजविलेल्या सहकार क्षेत्रामध्ये आज या जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची राणे साहेबांनी दिलेली  संधी हे मी माझं भाग्य समजतो. असे मत मान. श्री. मनीष दळवी साहेब यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सभागृहात त्यांच्या ४२ व्या वाढदिवसानिमित्त बँक कर्मचाऱ्यानी आयोजित केलेल्या कौटुंबिक अभिष्टचिंतन सोहळ्याला उत्तर देताना व्यक्त केले.

पुढे बोलतांना ते म्हणाले, संस्था हि निरंतर चालत असते. काळानुरुप संस्थेचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी बदलत रहातात. असे असले तरी आपण काम करत असतानां आपले काम भविष्य़ातील पिढ्यांसाठी आदर्शवत असले पाहिजे असे मला वाटते. बदलत्या स्पर्धायुक्त बँकिंग क्षेत्रात काम करत असताना आपणाला एक कुटुंब म्हणून काम करायचे आहे. सहकाराला एक दिशा द्यायची आहे. पारंपारिक बँकिंग व्यवस्थेतून आज सीबीएस सिस्टम मध्ये काम करत असताना बँकेच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनीच काळानुरूप आपल्य़ा मानसिकतेत बदल केले पाहिजेत. सहकाराला आधुनिकतेची जोड देत दिशा देण्याचे काम आपण सर्वांनी एकत्रितपणे करण्यासाठी सहकाराच्या या मंदिरात पारदर्शकपणे काम करण्याचा प्रयत्न आदरणीय केंद्रीय मंत्री श्री. नारायणराव राणे साहेब यांच्या नेत्तृत्वाखाली आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करीत आहोत. आज माझ्या वाढदिवसनिमित्त सहकारात काम करणाऱ्या अनेक व्यक्तिंनी प्रत्यक्ष भेटून, फोन वरुन व संवादाच्या विविध माध्यमातून दिलेल्या शुभेच्छा आणि सदिच्छा मला या पुढील काळात प्रेरणा आणि उर्जा देणाऱ्या आहेत. आपणा सर्वांचे आशीर्वाद व सहकार्य मला नेहमीच मिळत राहो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो व आपणा सर्वांना धन्यवाद देतो असे भावपूर्ण उद्गार जिल्हा बँकेचे अध्यक्ष माननीय मनीष दळवी साहेब यांनी काढले. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रमोद गावडे यांनी केले. यावेळी ते म्हणाले की गेल्या वर्षभरामधील प्रगतीचा आढावा घेतला तर या वेगाने ६००० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा येत्या वर्षात आम्ही निश्चित गाठू असा विश्वास त्यानी व्यक्त केला. या अभिष्टचिंतन सोहळ्यात मान. अध्यक्ष महोदय यांना शुभेछा देतांना सहकारतील ज्येष्ठ संचालक मान. श्री. गजानन गावडे साहेब यांनी मान. अध्यक्ष महोदय यांच्या नेतृत्वा बाबत बोलतांना त्याच्यातील असलेली उर्जा आणि चिकाटीचे कौतूक केले. तर संचालक श्री. प्रकाश मोर्ये यांनी मान. श्री. मनीष दळवी लहान वयापासूनच विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून कामकरीत असून त्यांची सहकारात काम करण्याची हातोटी, कौशल्य हे वाखाणण्याजोगे आहे. असे मत व्यक्त केले. तसेच य़ावेळी बँकेचे लेखाविभागाचे सरव्यवस्थापक श्री. दिवाकर देसाई, डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. पाटील साहेब, कर्मचारी संचालक श्री. देवेंद्र धुरी यांनी आपले मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.

या वेळी संचालक महोदय सर्वश्री. विठ्ठल देसाई, श्री. विदयाधर परब, श्रीम. प्रज्ञा ढवण, श्रीम. नीता राणे, श्री. समीर सावंत, श्री. आत्माराम ओटवणेकर, श्री. गणपत देसाई, अधिकारी कर्मचारी वर्ग व विविध क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार यांनी मान. मनीष दळवी यांनी शुभेच्छा देऊन त्यांच्याप्रती आदर व्य़क्त केला.