गुणात्मक दृष्ट्या सिंधुदुर्ग बँक महाराष्ट्रात एक नंबरवर : मनिष दळवी

Edited by:
Published on: July 01, 2024 12:41 PM
views 237  views

सिंधुनगरी : बँकिंग क्षेत्रामध्ये राष्ट्रीयकृत बँका देत असलेल्या सर्व अद्ययावत सेवा व सुविधा जिल्ह्यातील लाखो ग्राहकांना देत सिंधुदुर्ग बँकेने विश्वास संपादन केला आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात शेतकरी राजाला केंद्रबिंदू मानून अनेक योजना, सवलतीच्या दरात कर्जे, शेती पुरक व्यवसायासाठी मदत देण्यात सिंधुदुर्ग जिल्हा बँक नेहमीच अग्रेसर राहीली आहे. यावर्षी ३१०० कोटी रुपये ठेवींचा टप्पा गाठत पावणे सहा हजार कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. आज महाराष्ट्रातील पहिल्या तीन अग्रगण्य बँकांमध्ये आपल्या बँकेचे नाव घेतले जाते. गुणात्मक दृष्ट्या आज सिंधुदुर्ग बँक महाराष्ट्रात एक नंबरचे स्थानी आहे याचे सर्व श्रेय जिल्हावासियांना आहे. असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले. ते जिल्हा बँकेच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

ग्राहकांशी असलेले वर्षांनुवर्षीचे ऋणानुबंधाचे नाते दृढ करीत ग्राहकांच्या साक्षीने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ४१ वा वर्धापन दिन सोम. दि.१ जुलै २०२४ रोजी प्रधान कार्यालय, ओरोस- सिंधुदुर्गनगरी येथे साजरा करण्यात आला. यावेळी हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन संचालक महोदयांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वर्धापन दिनाचे औचित्य साधत बँकेने सामाजिक जबाबदारीचे भान राखत रक्तदान शिबिराचे आयोजन करुन ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्धाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून करण्यात आले. त्यानंतर बँकेच्या  नवीन फिचर्सचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये आता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मायक्रो एटीएम डिवाईसेस मधुन भारतातील कोणत्याही बँकेच्या एटीएम कार्ड धारकाला पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी यावेळी जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च  माध्यमिक शालांत परीक्षा २०२४ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. माध्यमिक शालांत परीक्षा २०२४ मधील इयत्ता दहावी प्रथम क्रमांक कु. निधी प्रकाश सावंत (सेंट उर्सुला स्कूल, वरवडे), कु. सौजन्या संजय घाटकर (नाथ पै. विद्यालय कुडाळ), द्वितीय क्रमांक कु. पुनम दिनेश दळवी (पणदुर हायस्कूल पणदुर), कु.अर्पिता अमेय सामंत (अण्णासाहेब देसाई विद्यालय परूळे), कु. कैवल्य सागर मिसाळ (टोपीवाला हायस्कूल मालवण), तृतीय क्रमांक कु.गायत्री विजयकुमार राठोड (न्यू. इंग्लिश स्कूल फोंडाघाट), उच्च माध्यमिक शालांत परीक्षा २०२४ मधील इयत्ता बारावी प्रथम क्रमांक कु. तन्वी केदार म्हाडगुत (डॉन बास्को हायस्कूल व ज्यु.कॉलेज ओरोस), द्वितीय क्रमांक कु. आराध्य मंदार भिसे (डॉन बॉस्को हायस्कूल व ज्यु. कॉलेज ओरोस), तृतीय क्रमांक कु.परेश सतीश मडव (कणकवली कॉलेज कणकवली), तृतीय क्रमांक कु.स्नेहलता सत्यविजय तेली (टोपीवाला जु.कॉलेज मालवण) या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या संचालकांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. त्यानंतर डोअर स्टेप बँकींग सुविधेमध्य व अल्पबचत कामकाजात चांगले योगदान देणारे अल्पबचत प्रतिनिधी रवींद्र एकनाथ आदम (पडेल), श्री. विष्णू गुरुनाथ जोशी (आरोंदा), श्री. अभिजीत पुंडलिक वंजारे (घोटगे), श्री. भैरवनाथ बुगडे (दोडामार्ग), श्रीम. कमल तिरवडेकर (कुडाळ), श्री. सुनील सांबारी (दोडामार्ग) यांचा सत्कार जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते  करण्यात आला करण्यात आला. यावेळी यावेळी अल्पबचत प्रतिनिधी विष्णू जोशी व रवींद्र आदम व भैरवनाथ बुगडे यांनी आपले अनुभव कथन केले. 

या कार्यक्रमात पुढे बोलतांना अध्यक्ष मनिष दळवी म्हणाले कि  कै. केशवराव राणे, शिवरामभाऊ जाधव, ढोलम साहेब व आजपर्यंत असलेले बँकेचे संचालक मंडळ यानी आपले योगदान दिले आहे. त्यांचे यानिमित्ताने स्मरण करीत आहोत. प्रत्येक संचालक मंडळाने बँकेच्या विविध धोरणात्मक निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेत असतांना पुढच्या दहा वर्षानंतर ही बँक कुठे असेल याचा विचार सातत्याने केला आणि म्हणूनच सिंधुदुर्ग बँक वयाने कमी असून सुद्धा आज १०० वर्ष कामकाज केलेल्या जिल्हा बँकांच्या बरोबर बँकेचे नांव घेतले जाते ही गौरवाची बाब आहे. सहकार क्षेत्रात मध्ये काम करत असताना मर्यादा आहेत पण या मर्यादांच्या पलीकडे जर जायचं असेल तर आपल्याला ग्राहक सेवेवर भर देऊन वेगवेगळ्या क्षेत्रातले ग्राहक जोडावे लागतील. एकंदरीतच शेतकऱ्यांबरोबर व्यापारी, उद्योजक, बागायतदार, नोकरदार, कामगार, महिला, बचत गट, विद्यार्थी या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांसाठी सर्व समावेशक काम केले तरच  प्रगतीची पुढची पावलं टाकणं अगदी सोपे होणार आहे. 

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सर्वश्री व्हीक्टर डान्टस, आत्माराम ओटवणेकर, विठ्ठल देसाई, संदिप परब, समीर सावंत, संचालिका सौ.प्रज्ञा ढवण, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, जिल्हा बँकेचे अधिकारी, कर्मचारी, संस्था प्रतिनिधी, अल्पबचत प्रतिनिधी, गुणवंत विद्यार्थी व पालक आदि मान्यवर मोठ्या उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन शरद सावंत यांनी केले.