
दोडामार्ग : पत्रकारांनी त्यांच्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी योग्य जागा निवडली असून एकप्रकारे येथील पर्यटनाचा प्रचार करण्यासाठी प्रयत्न केला आहे. पर्यटनाचा विकास करताना स्थानिकांचा आवाज ऐकण्याची गरज आहे. येथील पर्यटनाचा विकास करण्यासाठी पत्रकारांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या पत्रकारांचे कौतुक करावे तेवढेच आहे असे गौरवोद्गार जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी काढले.
दोडामार्ग तालुका पत्रकार समितीचा पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी सकाळी येथील निसर्ग फार्ममध्ये संपन्न झाला. दीपप्रज्वलन करून, छत्रपती शिवाजी महाराज व आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, शिंदे शिवसेना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख प्रेमानंद देसाई, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष संदीप देसाई, मुख्याधिकारी संकेत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत, प्रकाश गवस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उपजिल्हाध्यक्ष संदीप गवस, काँग्रेस तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख संजय गवस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष सत्यवान गवस, पत्रकार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
दै. कोकणसाद, कोकणसाद लाईव्हचे दोडामार्ग प्रतिनिधी लवू परब यांसह शंकर जाधव यांना उदयोन्मुख पत्रकार पुरस्कार तर पत्रकार रत्नदीप गवस, प्रभाकर धुरी यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला. सार्वजनिक बांधकाम उपविभागचे उप अभियंता अनिल बडे, उद्योजक तथा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर दत्ताराम उर्फ बाबा टोपले व उद्योजक सिद्धेश भोसले यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या विशेष कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत म्हणाले, वृत्तपत्रांची विश्वासार्हता अजूनही कायम आहे. पालकमंत्री पत्रकारांबाबत खूपच सकारात्मक आहेत. राज्यस्तरावर ज्याप्रमाणे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दिला जातो, त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर हा पुरस्कार देण्याची विनंती आपण पालकमंत्र्यांकडे केली असता त्यांनी होकार देत याबाबत प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्याचे श्री चिलवंत यांनी स्पष्ट केले. पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर म्हणाले, पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. दोडामार्ग तालुक्यातील पत्रकारांबाबत जी दुर्दैवी घटना झाली, त्यावेळी येथील सर्व राजकारणी कितपत पत्रकारांच्या पाठीमागे उभे राहिले ही चिंतनाची बाब आहे. प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांना शासनाने चौथा स्तंभ म्हणून मान्यता दिलेली आहे असे स्पष्ट केले.
विवेकानंद नाईक म्हणाले, येथील पत्रकार त्यांची भूमिका चौख बजावत आहेत. सामाजिक कामात तर या पत्रकारांचा खूप मोठा वाटा आहे. जीव वाचवण्याचे काम देखील येथील पत्रकार करत असून तालुक्यातील सर्वच पत्रकारांचा आपणास अभिमान असल्याचे विवेकानंद नाईक यांनी स्पष्ट केले. राजेंद्र म्हापसेकर म्हणाले, एखादी छोटी गोष्ट असली तरी विकासासाठी त्या गोष्टीला न्याय देण्याचे काम येथील पत्रकार करतात. बाबुराव धुरी म्हणाले अनेक समस्यांनी वेढलेल्या या छोट्या तालुक्यातील समस्या मांडण्याचे काम येथील पत्रकार हिरीरीने करतात. गणेशप्रसाद गवस म्हणाले, दोडामार्ग तालुक्याला निदान विधान परिषदेवर तरी आमदार द्यावा याबाबत येथील पत्रकारांनी लेखनी लिहावी असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस देसाई, प्रास्ताविक अध्यक्ष संदीप देसाई व आभार सचिव गणपत डांगी यांनी मानले.