
दोडामार्ग : घोटगे येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे रविवारी ४५ हजारहुन अधिक केळी उध्वस्त झाल्या. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांसह अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त केळी बागायतींची सोमवारी पाहणी केली. शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही भक्कम पणे उभे राहू. त्यामुळे पंचनामे अगोदर करू द्या. विशेष बाब म्हणून शासनाकडून आर्थिक मदत मागून घेऊ असे आपणांस पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले असल्याचे श्री. दळवी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आश्वान दिल्या नंतर शेतकऱ्यांनी पंचनामे करण्यास परवानगी दिली.
घोटगे गावात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने येथील शेतकऱ्यांच्या केळी बागायती उध्वस्त केल्या. यात सुमारे ४५ हजारांहून अधिक केळी जमीनदोस्त झाल्या. काबाडकष्ट करून उभ्या केलेल्या या बागायती नष्ट झाल्याचे पाहून अनेक शेतकऱ्यांना दुःख अनावर झाले होते. या घटनेची पालकमंत्री नितेश राणे यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी त्यांचे प्रतिनिधी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांना नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पाठवले होते.
मनीष दळवी यांनी सोमवारी घोटगे येथे जात नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँक संचालक महेश सारंग, तहसीलदार अमोल पोवार, तालुका कृषी अधिकारी सौरभ कदम, शिंदे शिवसेना दोडामार्ग तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, नगरसेवक संतोष नानचे रामदास मेस्त्री, भगवान गवस, यांसह महायुतीचे पदाधिकारी, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. श्री. दळवी यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी शेतकरी संदीप दळवी, भरत दळवी, विनय दळवी, आबा दळावी, मनोज दळवी, यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
तुटपुंजी नुकसान भरपाई नको
केळी पिकाची नोंद शासनाने नगदी पिकात ठेवली आहे. मात्र हे पीक तेरा महिन्यांनी मिळते आणि याची शासनाला जाण नाही का? असे म्हणत शासन केळीच्या एका झाडाला १० रुपये मदत करते. त्यामुळे शासनाची ही तुटपुंजी मदत आम्हा शेतकऱ्यांना नको अशी कैफियत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मनीष दळवी यांच्यासमोर मांडली. तसेच तौक्ते चक्रीवादळाचे नुकसान भरपाई अद्याप आम्हा शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे शासनाकडून ही भरपाई मिळेल अशी आम्हाला अजिबात आशा नाही अशी व्यथा शेतकऱ्यांनी श्री. दळवी यांच्यासमोर मांडली. प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी नुकसानीची पाहणी केली व १०० टक्के पंचनामे करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
झालेल्या नुकसानीची पालकमंत्री नितेश राणे यांनी दखल घेतली असून जिल्हाधिकारी व तहसीलदारांशी ते रात्री च बोलले आहेत. कृषीमंत्र्यांची भेट घेऊन ना. राणे विशेष बाब म्हणून मदत मागून घेणार आहेत. शासन नुकसान भरपाई देईल, मात्र पालकमंत्री स्वतः ती वाढीव स्वरूपात करून घेणार आहेत आणि याचा पाठपुरावा आम्ही करू. पालकमंत्र्यांनी एका दिवसात नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे अगोदर पंचनामे करू द्या. पंचनामे झाल्यास नुकसानीचा आकडा समोर येईल व शासनाकडून मदत घेण्यास सोपे होईल. शिवाय ना. नितेश राणे यांच्यासोबत तुम्हा शेतकऱ्यांची लवकरच भेट घडवून देऊ असे आश्वासन श्री. दळवी यांनी शेतकऱ्यांना दिले.
केळी पिकावर येथील शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. येथील तरुणाई देखील शेतीकडे वळत आहे. मात्र निसर्गाच्या कोपामुळे आम्हा शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. मागील तीन वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळाले नाही. या शेतकऱ्यांना शासनाने योग्य मदत केली तर ही तरुणाई शेतीकडे राहील, नाहीतर वाम मार्गाला लागेल. त्यामुळे तुम्ही मदत करा, अशी आर्त विनवणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मनीष दळवी यांच्याकडे केली.
दरम्यान, शेतकरी भरत दळवी बोलताना म्हणाले की पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर आमचा विश्वास आहे कारण काल घटना घडली आणि आज त्यांनी आमच्या केळी बागायतीची प्रशासना समवेत दखल घेतली. मात्र तुटपुंजी रक्कम आम्हाला नको विशेष बाब म्हणू आर्थिक मदत करा जेणे करून लागवडी साठी केलेला खर्च तरी उभा राहील ही आशा आहे. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांनी आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा हीच मागणी.