आंबा हंगाम संकटात? संशोधन केंद्रातील अधिकारी गायब; शेतकरी चिंताग्रस्त

सुराज्य अभियानाचा इशारा : 'मुंबईतून आंबा वाचणार कसा?'
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: November 21, 2025 18:56 PM
views 51  views

सिंधुदुर्गनगरी : कोकणातील आंबा हंगाम उंबरठ्यावर आला असताना फुलमाशी, तुडतुडे आणि इतर आजारांचा धोका वाढत चालला आहे. अशा संवेदनशील काळात गिर्ये-रामेश्वर आंबा संशोधन केंद्रातील प्रमुख अधिकारी मुंबईत जास्त आणि केंद्रात कमी थांबतात, असा गंभीर आरोप सुराज्य अभियानचे समन्वयक डॉ. रविकांत नारकर यांनी पत्रकार परिषदेत केला. संशोधन केंद्राचा कारभार सुधारला नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन येथे हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाची पत्रकार परिषद डॉ. नारकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर, राजेंद्र पाटील, सत्यवान कदम, बागायतदार दीपक वारिक, विकास दीक्षित, रविंद्र कारेकर, अशोक करंगुटकर आदी उपस्थित होते.

डॉ. नारकर म्हणाले, “आंब्यावरील कीडरोग वाढण्याचा हा मुख्य कालावधी आहे. अधिकारी जागेवर नसतील तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन कोण देणार? मुंबईत बसून संशोधन केंद्र चालविण्याची पद्धत चुकीची असून त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो आहे.”

शेतकरी प्रतिनिधी श्रीकृष्णा दुधवडकर म्हणाले, “अधिकाऱ्यांना संपर्क केला की ‘लवकरच येतो’ असे सांगून विषय टोलवला जातो. उपलब्ध औषधे परिणामकारक नसल्याच्या तक्रारी सातत्याने मिळत आहेत. तातडीने नवे मार्गदर्शन आणि औषधांची उपलब्धता न मिळाल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.”

कायमस्वरूपी हेल्पलाईनची मागणी : आंबा पिकावरील आजार, त्यावरील उपाययोजना आणि शेतकऱ्यांना तातडीचे मार्गदर्शन मिळावे यासाठी संशोधन केंद्रात कायमस्वरूपी हेल्पलाईन नंबर सुरू करावा, तसेच नमुना बाग तयार करून आधुनिक पद्धतीचे प्रात्यक्षिक द्यावे, अशी मागणी भास्कर खाडिलकर यांनी केली.

शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारी आणि अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे कोकणातील आंबा हंगामावर संकटाचे सावट घोंगावत असल्याचे सुराज्य अभियानाने स्पष्ट केले.