शॉर्ट सर्किटमुळे आंबा कलम बाग आगीच्या भक्ष्यस्थानी

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 25, 2024 11:27 AM
views 175  views

देवगड : देवगड येथे  शॉर्ट सर्किटमुळे तिर्लोट तांबोळ येथील हापुस आंबा कलम बागेला आग लागली असून सुमारे दीडशे आंबा कलमे आगीमध्ये होरपळून गेली आहेत.यामध्ये लाखाच्या घरात आंबा बागायतदारांचे नुकसान झाले आहे.आंबा कलमांवर तयार झालेला आंबा देखील या आगीमध्ये भाजून गेला आहे.ही आग बुधवारी दुपारी 3.30 वा. सुमारास लागली असून, या आगीमध्ये तिर्लोट येथील आंबा बागायतदार भिकाजी उर्फ बबन लिंगायत गुरव यांची सुमारे 100 कलमे तर घाडी कुटूंबीयांची 50 कलमे या आगीत होरपळली. कलम बागेमधून वीज वितरण कंपनीची वीज वाहिनी गेली होती. या वीज वाहिनीला आंबा कलमाच्या फांदीचा स्पर्श झाल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागली. दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे समजताच तिर्लोट गावातील ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली केले. यावेळी वीज वितरण विभागाला या घटनेची माहिती देण्यात आली. वीज वितरणचे कर्मचारी घटनास्थळी हजर होऊन सदर घटनेची पाहणी केली. या कलम बागेमध्ये झाडांना आंबे लागलेले होते. आगीमुळे भाजल्याने आंबा बागायतदारांचा सुमारे लाखो रुपये नुकसान झाले आहे.