
देवगड : देवगड तालुक्यातील कुणकेश्वर चांदेलवाडी येथील आंबा बागायतदार मोहन शंकर पेडणेकर यांच्या कुणकेश्वर चांदल वाडी येथील हापूस आंबा कलम बागेतील ५ डझनची पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केट मधील ज. ना. कंपनी कडे गुरुवारी सायंकाळी रवाना झाली. या आंबा पेटीची विधीवत पूजा उद्योगपती नंदकुमार घाटे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी रामदास पेडणेकर, निलेश पेडणेकर, नागेश आचरेकर शरद शिंदे, संजय पेडणेकर, दयानंद मांगले, प्रतीक पेडणेकर उपस्थित होते.
आज पहिल्या आंबा पेटीचा शुभारंभ करीत असताना आनंद होत असला तरी अवकाळी पावसाने आंबा पिकाची तसेच आंबा मोहोराची झालेली हानी ही शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणणारी आहे. त्यातच थ्रीप्स सारख्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून ऐन आंबा हंगामात अपेक्षेप्रमाणे आंबा पीक होणार नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बोगस औषधांचा सुळसुळाट वाढला असून अति महागड्या दराने याची विक्री होत असल्याने शेतकऱ्याचे आर्थिक संकट वाढले आहे. शासनाने अवकाळी पावसात आंबा पिकाची झालेली हानी बाबत अधिकाधिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही बागायतदारकडून होत असल्याची माहिती निलेश पेडणेकर यानी दिली आहे.