
सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे प. पू. टेंब्ये स्वामींनी स्थापलेले प्रसिद्ध श्री दत्त मंदिर येथे आजपासून दत्त जयंती उत्सवाला मोठ्या भक्तिभावात सुरुवात झाली. हजारो भाविकांनी श्री दत्तगुरूंचे दर्शन घेतले. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामघोषाने माणगावनगरी आज दुमदुमली. माणगाव क्षेत्री भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी गेली होती. सकाळपासूनच भाविक माणगावनगरीत प्रवेश करीत होते. अनेकांनी दत्तगुरूंच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. दत्त जयंती उत्सवानिमित्त परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून ‘श्री गुरुदत्त दिगंबर’ या जयघोषाने सर्वत्र नाद घुमला.
माणगाव येथे गुरुवारी पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत होती. श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा, कोल्हापूर, रत्नागिरी तसेच राजस्थान, मुंबई या ठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते.
श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या जयंतीचा सोहळा प्रत्येक दत्त भक्तासाठी पावन दिवस असतो. या दिवशी दत्तात्रय महाराजांच्या मूर्तीची किंवा पादुकांची पूजा केली जाते. सायंकाळी दत्त महाराजांचा पाळणा हलवला जातो. दत्तजयंतीचे अनन्यसाधारण महत्त्व पुराणातही सांगण्यात आले आहे. दत्त जयंतीच्या आधी भक्त दत्त परिक्रमा पूर्ण करतात.
मंदिरात गुरुवारी पहाटे अभिषेक, महापूजा, आरती तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दत्त जयंतीनिमित्त मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासन तसेच स्थानिक स्वयंसेवकांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस प्रशासनही सतर्क होते.
श्री दत्त परिक्रमेचे महत्त्व
वाट चुकलेल्या भक्ताला योग्य मार्ग दाखवण्याचे काम गुरु करतो आणि श्री दत्त महाराजांना गुरु मानले जाते. भक्तांना जीवनाचा अर्थ त्यांनी समजावून सांगितलेला आहे. भारतभर त्यांची अनेक मंदिरे आहेत. त्यांपैकी २४ स्थाने अशी आहेत ज्यांची परिक्रमा पूर्ण करण्याला महत्त्व आहे. २४ स्थानांपैकी १५ ठिकाणे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गुजरात या चार राज्यांतील अशा २४ दत्तस्थानांना भेट देताना एकूण ६०० किमीचा प्रवास करावा लागतो. या परिक्रमेची सुरुवात श्री शंकर महाराज समाधी मंदिरापासून केली जाते.










