
कणकवली : कणकवली तालुक्यातील मंगलज्ञान प्ले स्कूल या पूर्व प्राथमिक शाळेचा शाळा गुणवत्ता मानांकन प्रमाणपत्र प्रदान सोहळा नुकताच संपन्न झाला. पूर्व प्राथमिक शाळा मान्यता परिषद भारत यांच्या मार्फत शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी सुरक्षा, भौतिक साहित्याची उपलब्धता, अध्यापन पद्धती, शिक्षक पालक सहयोग अशा विविध निकषांच्या मूल्यांकनानंतर हे मानांकन देण्यात आले आहे.
या कार्यक्रमात पूर्व प्राथमिक शाळा मान्यता परिषद भारतच्या जिल्हा समन्वय रूपाली कदम यांनी पालकांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी विशाखा कमिटीची स्थापनाही करण्यात आली. मूल्यांकन प्राप्त खाजगी शाळांना शाळा व्यवस्थापन ऍप, नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित अभ्यासक्रम, शिक्षक प्रशिक्षण अशा विविध सुविधांचा लाभ घेता येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. श्रावणी सुतार यांनी केले. संचालिका सौ. पूर्वा वातकर यांनी मनोगत व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










