समुद्रकिनारी बेशुद्ध आढळले होते ; उपचारादरम्यान निधन

ओळखत असल्यास साधावा संपर्क
Edited by: दिपेश परब
Published on: August 28, 2023 18:05 PM
views 458  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला हरिचरणगिरी येथील समुद्रकिनारी बेशुद्धावस्थेत आढळलेल्या चेतन मधुसूदन सामंत (५४) यांना उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. दरम्यान त्यांच्याजवळ मिळालेल्या आधारकार्ड वरून ते  ठाणे - वसई येथील रहिवासी असल्याची माहिती वेंगुर्ला पोलिसांनी दिली आहे. 

    आज २८ ऑगस्ट दुपारी ३ वाजता  सागर रक्षक दलाचे सदस्य उमेश धुरी यांना ही व्यक्ती बेशुद्धावस्थेत एका दगडावर टेकून उभी असलेली आढळून आली. दरम्यान याबाबत सागर रक्षक दलाचे सदस्य योगेश तांडेल यांनी वेंगुर्ला पोलिसात खबर दिल्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश तावडे, पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर, होमगार्ड पांडुरंग मठकर, सगुण नाईक यांनी घटनास्थळी दाखल होत चेतन सामंत यांना रुग्णवाहिकेच्या साहाय्याने वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांचा श्वास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे. ही व्यक्ती गेले २ दिवस या परिसरात एकटीच फिरत असल्याची माहिती मिळाली आहे. 

दरम्यान या व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर वेंगुर्ला पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले आहे.