मालवण नगरपालिका प्रभाग ४ मध्ये पूनम चव्हाणांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे दिग्गज मैदानात !

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याहस्ते प्रचार कार्यालयाचे उदघाट्न ; युवाईचा शिवसेनेत प्रवेश
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 26, 2025 18:54 PM
views 9  views

मालवण : मालवण नगर परिषद प्रभाग ४ मध्ये शिवसेनेच्या उच्च शिक्षित उमेदवार सौ. पूनम नागेश चव्हाण यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शहरातील दिग्ग्ज पदाधिकारी त्यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असून प्रभागातील नागरिकांच्या भेटीगाठी घेत शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, प्रभागातील साईराज चव्हाण, सागर गावकर, हर्षदा कारेकर, देवदास गावकर आदींनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. निवडणुकीच्या निमित्ताने पूनम चव्हाण यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाट्न यावेळी दत्ता सामंत यांच्याहस्ते करण्यात आले. 

यावेळी शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. ममता वराडकर, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख दीपक पाटकर, उमेश नेरूरकर, जॉन नरोन्हा, परशुराम पाटकर, अंकित नेरूरकर, नागेश चव्हाण, निकित वराडकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून वर्षभरात झालेल्या कामांचा आढावा घेऊन येत्या काळात नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आल्यास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. तर नगरसेवक पदाच्या उमेदवार पूनम चव्हाण यांनी आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.