
मालवण : त्याच त्याच चेहऱ्यांना जनता कंटाळली आहे. मतदारांनाच आता परितर्वन हवे आहे. त्यासाठी ठाकरे शिवसेना-काँग्रेस हाच सक्षम पर्याय जनतेसमोर आहे. माझी कर्मभूमी धुरीवाडा असून या ठिकाणी आपण नावारुपास आलो आहे. त्यामुळे या होमपिचवरून मताधिक्य घेऊनच आपण नगराध्यक्ष पदासाठी पूजा प्रमोद करलरकर, ठाकरे शिवसेना उमेदवार पूजा जोगी आणि काँग्रेस उमेदवार संदेश कोयंडे यांच्या विजयाने आम्ही मालवणातील परिवर्तनाला प्रारंभ करणार आहोत, असा विश्वास ठाकरे शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी व्यक्त केला.
प्रभाग १ येथे ठाकरे शिवसेनेने प्रचारात आघाडी घेतली आहे. सध्या घरोघर प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहे. या प्रभागात केलेली विकासकामे आणि जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे. तौक्ते वादळ असो वा फियान. यामध्ये या प्रभागातील आपत्तीमध्ये सापडलेल्या मच्छीमारांना शासन स्तरावर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे. चांदा ते बांदा तसेच शासनाच्या विविध योजनांतून निधी धुरीवाडा परिसरातील नागरिक आणि मच्छीमारांना व्यवसायासाठी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मच्छीमारांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भक्कम पाठिंबा मिळत आहे, असेही जोगी म्हणाले.
काही उमेदवारांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने त्यांनी पक्षबदल करण्यास सुरुवात केली आहे. काही लोकप्रतिनिधी तर पालिका आपली मालमता समजून तिचा फायदा घेत होते. त्यामुळे जनतेसमोर ठाकरे शिवसेना, काँग्रेस हा एकमेव सक्षम पर्याय मालवणात उभा असल्याने जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा आणि आशीर्वाद आम्हाला मिळत आहे, असेही जोगी म्हणाले.










