माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकरांची अपक्ष उमेदवारी

मालवणात खळबळ
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 17, 2025 15:31 PM
views 332  views

मालवण : एकेकाळी शहरात किंगमेकर असलेले माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांना भाजपाने तिकीट नाकारल्याने खळबळ उडाली आहे. प्रभाग 7 मधून आचरेकर इच्छुक होते. मात्र, त्या प्रभागात सौरभ ताम्हणकर यांना भाजपाने उमेदवारी देत आचरेकरांच तिकीट कापले आहे. त्यामुळे आचरेकर यांनी आता अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. 

नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. भाजपाकडून काही प्रभागातील उमेदवारांची नावे जाहीर केली नव्हती. त्यात प्रभाग 7 मधून सुदेश आचरेकर यांनी भाजपाकडे नगरसेवक पदासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र, शेवटच्या क्षणी आचरेकर यांचा भाजपने पत्ता कट केला आहे. गेले अनेक वर्षे आचरेकर पक्षातील उमेदवार ठरवत असतं. आताही भाजपाने त्यांच्यावर काही जबाबदारी दिली होती. त्यानुसार शहरात कुठच्या प्रभागात कोणता उमेदवार चालेल यासंह उमेदवारांची चाचपणी आचरेकर करत होते. 

अगदी काल भाजपाच्या नगराध्यक्ष पदासह अनेक उमेदवारांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यावेळी आचरेकर सर्वात पुढे होते. इतकेच नव्हे तर सुदेश आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली शहरात भाजपा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सुद्धा झाली होती. असे असताना ऐनवेळी आचरेकर यांचाच पत्ता भाजपने कट केला आहे. त्यांच्याऐवजी तरुणांना संधी देत सौरभ ताम्हणकर यांना. उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या आचरेकर यांनी प्रभाग 7 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.