
मालवण : नगराध्यक्ष पदासह नगरसेविका पदासाठी देखील मी इच्छुक म्हणून शहर भाजपाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र शहरात झालेल्या बैठकीला आणि ओरोस येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या मुलाखतीला आपल्याला भाजपाकडून बोलवलेच नाही, अशी भूमिका माजी नगरसेविका ममता वराडकर यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.
ममता वराडकर या नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून इच्छुक नसल्याचे बाबा मोंडकर यांनी सांगितले होते. त्यावर वराडकर यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी मोहन वराडकर, निकेत वराडकर, चंद्रकांत आचरेकर, विनायक रेडकर अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
वराडकर म्हणाल्या, नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेविका पदासाठी मी शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांच्याकडून अर्ज घेतला होता. या दोन्ही पदासाठी मी अर्ज भरून मोंडकर यांच्याकडे दिला होता. त्याचा पुरावा आपल्याकडे आहे. इच्छुक म्हणून नाव दिल्यानंतर आपल्याशी पक्षाने संपर्कच साधला नाही. आम्ही भाजपामध्ये असतानाही आम्हाला कुठच्याही बैठकीला बोलावले नाही. आम्ही सुरुवातीपासून राणे समर्थक आहोत. खासदार नारायण राणे यांनी ज्यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी काँग्रेस मधून नगरसेविका म्हणून निवडून आले होते. खासदार नारायण राणे भाजपामध्ये गेले त्यावेळेपासुन आजपर्यंत आम्ही भाजपामध्ये आहोत. आज माझे इच्छुकांमध्ये नावच नाही असे मोंडकर यांनी सांगितले, शिवाय पक्षाच्या बैठकीला बोलावले नसल्यानेच आम्ही महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे वराडकर यांनी स्पष्ट केले.











