
मालवण : श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन संचलित डॉ. श्रीधर सिताराम कुडाळकर हायस्कूल, मालवण येथील इयत्ता सातवीतील विद्यार्थीनी कुमारी महिमा स्वीटी विशाल मोहिते हिने शालेय क्रीडा जगतामध्ये अभूतपूर्व असा इतिहास रचत संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. तीन क्रीडा प्रकारात जिल्ह्यात प्रथम, तर विभागात हॅट्रिक केली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य – जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये महिमाने 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे व लांब उडी या तिन्ही प्रकारात निर्विवाद वर्चस्व गाजवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. या कामगिरीच्या जोरावर तिने डेरवण, चिपळूण (रत्नागिरी) येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत थरारक प्रदर्शन करत रेकॉर्डब्रेक कामगिरी साकारली. तिन्ही प्रकारात सुवर्णपदक जिंकत तिने हॅट्रिक साधली असून, आजवरच्या विभागीय स्पर्धेत अशी हॅट्रिक करणारी महिमा ही पहिलीच बालगटातील खेळाडू ठरली आहे.
कुडाळकर हायस्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकत असलेल्या महिमाने अल्पवयात दाखवलेली ही चमकदार क्रीडाकौशल्ये मालवणवासीयांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. तिच्या या यशाच्या जोरावर येत्या 12 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य शालेय मैदानी स्पर्धेत ती कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. राज्यस्तरावर तिने गोल्ड जिंकावे, असा विश्वास व आशेची उभी झेप सर्व मालवणवासीयांनी व्यक्त केली आहे.
महिमाच्या भव्य यशाबद्दल श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री विलास झाड, कार्याध्यक्ष कृष्णा बांदेकर, उपाध्यक्ष भालचंद्र राऊत, सचिव महेश मांजरेकर, खजिनदार विनायक निवेकर, मुख्याध्यापिका सौ. नंदिनी साटलकर, सौ. प्राची परब तसेच सर्व शिक्षकांनी तिचा सत्कार करून अभिनंदन केले.
या उज्ज्वल कामगिरीच्या मागे क्रीडा शिक्षक अजय शिंदे, प्रशिक्षक अनिकेत पाटील, तसेच पालक स्वीटी मोहिते व विशाल मोहिते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. विशेष म्हणजे, क्रीडा मार्गदर्शक अजय शिंदे सरांच्या 28 वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच एखाद्या खेळाडूने विभागीय स्तरावर हॅट्रिक साधत तीन सुवर्णपदके जिंकली आहेत. “राज्यस्तरीय स्पर्धेतही गोल्ड जिंकून सरांना निवृत्तीची खास भेट द्यायची आहे,” असा भावनिक निर्धार स्वतः कुमारी महिमाने व्यक्त केला. अल्पवयात असा दमदार विक्रम घडवणारी महिमा राज्यस्तरावरही सुवर्णपदक जिंकून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करेल, अशी सर्वत्र अपेक्षा व्यक्त होत आहे.










