
मालवण : अतिवृष्टीमुळे मालवण - तारकर्ली भागातील रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने आणि भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यासाठी खोदलेला रस्ता दुरुस्त न केल्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार करूनही रस्त्याची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांसह स्थानिक ग्रामस्थांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. नोव्हेंबर अखेरपर्यंत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. याबाबतचे निवेदनही त्यांना सादर करण्यात आले.
मालवण तारकर्ली- देवबाग रस्त्याच्या दुतर्फा अति पावसामुळे मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. याचा थेट परिणाम वाहतुकीवर होत असून पर्यटक आणि स्थानिकांना ये-जा करताना प्रचंड अडथळा होत आहे. झाडी वाढल्यामुळे रस्त्याच्या बाजूने वाहने घेणेही शक्य होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी तातडीने झाडी तोडण्याची मागणी केली आहे.
तीन गावांतील भूमिगत वीजवाहिन्यांसाठी वीज वितरण कंपनीने एप्रिल २०२५ मध्ये रस्त्याच्या बाजूने खोदकाम केले आहे. मात्र खोदलेल्या रस्त्याच्या बाजूने केबल टाकून झाले असले तरी रस्त्याची दुरुस्ती अद्याप झालेली नाही. याबद्दल कार्यालयाला लेखी निवेदन देऊनही फक्त तोंडी आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे नोव्हेंबर अखेरपर्यंत पर्यंत तारकर्ली रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, माजी उपसरपंच श्याम झाड, देवानंद लोकेगावकर, मिलिंद झाड, तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, रुपेश सातार्डेकर, नारायण लुडबे, हरेश पडवळ, लीलाधर झाड, अमित झाड आदी उपस्थित होते.










