नारळाचं झाड थेट वीज वाहिन्यांवर कोसळले...

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 25, 2025 18:18 PM
views 188  views

मालवण : सुट्टीचा हंगाम सुरू असतानाच आज सकाळी चिवला बीच परिसरात वादळी वाऱ्याने नारळाचे झाड थेट वीज वाहिन्यांवर पडल्याने महावितरणच्या वीज वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले आणि परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला.

सुट्ट्यांमुळे चिवला बीचवर पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने स्थानिकांसह पर्यटकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खोत यांनी कोणतीही वेळ न दवडता महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला आणि स्थानिकांच्या मदतीने युद्धपातळीवर वीज वाहिन्या दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले. त्यांच्या या तत्परतेमुळे अल्पावधीतच वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले. यामुळे पर्यटकांची होणारी गैरसोय आणि स्थानिकांचे संभाव्य नुकसान टळले.

या संकटकाळात यतीन खोत यांना परिसरातील मनोज शिरोडकर, रुपेश कांबळी, गणेश चिंदरकर, मनोज मयेकर, प्रदीप मयेकर, सर्वेश बागवे, राज कांदळकर यांसह इतर स्थानिक नागरिकांनी मदतकार्य केले.