
मालवण : सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांच्या पाठपुराव्यामुळे मालवणचे रॉकगार्डन अखेर दोन महिन्यांनी पुन्हा प्रकाशमान झाले आहे. तांत्रिक अडचणींमुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत झाल्याने पर्यटक व स्थानिक व्यावसायिक यांनी समाधान व्यक्त केले आहे.
शहरवासीयांचे आणि पर्यटकांचे खास आकर्षण असलेले येथील रॉकगार्डन गेले दोन महिने अंधारात होते. तांत्रिक अडचणींमुळे येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. याचा थेट परिणाम स्थानिक पर्यटन व्यवसायावर होत होता. विशेषतः सायंकाळी रॉकगार्डन काळोखात असल्याने अनेक पर्यटक नाराज होऊन माघारी परतत होते.
स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी ही समस्या सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांच्या निदर्शनास आणून दिली. खोत यांनी या बाबीची तत्काळ दखल घेत पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि रॉकगार्डनमधील वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे अखेर पालिका प्रशासनाने तांत्रिक अडचणी दूर करत वीजपुरवठा सुरळीत केला आहे.
वीजपुरवठा सुरू झाल्याने रॉकगार्डन पुन्हा एकदा पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सज्ज झाले आहे. यामुळे पर्यटकांमध्ये तसेच स्थानिक व्यावसायिक वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. रॉकगार्डनला भेट देणाऱ्या पर्यटकांकडून पालिका कर आकारणी करते, त्यामुळे वीज नसल्यामुळे पालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला होता. आता वीज पुरवठा पूर्ववत झाल्यामुळे पालिकेच्या उत्पन्नातही वाढ होण्याची अपेक्षा आहे.
या समस्येवर तोडगा काढल्याबद्दल स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांचे आभार मानले आहेत.