
मालवण : पर्यटकांचे खास आकर्षण असलेले मालवण रॉक गार्डन सध्या वीज पुरवठ्या अभावी सायंकाळच्या वेळेस पूर्णतः अंधारात गेले आहे. ऐन पर्यटन हंगामात रॉक गार्डन अंधारात बुडाल्याने पर्यटकांना निराश होऊन माघारी परतावे लागत आहे. याचा थेट परिणाम स्थानिक व्यावसायिकांच्या व्यवसायावर झाला आहे. या गंभीर समस्येची दखल घेऊन पालिका प्रशासनाने रॉक गार्डन मधील वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा, अन्यथा पालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनी दिला आहे.
मालवण शहरातील रॉक गार्डन हे पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण केंद्र आहे. किल्ले सिंधुदुर्गसह अन्य पर्यटन स्थळांना भेट देणारे पर्यटक आवर्जून रॉक गार्डनला भेट देतात. हजारो पर्यटक दाखल होत असल्याने हा परिसर नेहमी गजबजलेला असतो आणि त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचा व्यवसायही तेजीत असतो. मात्र, गेले महिनाभर रॉक गार्डन मधील वीजपुरवठा खंडित झाला असल्याने सायंकाळनंतर संपूर्ण परिसर काळोखात बुडतो.
वीज नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होत असून, त्यांना नाराज होऊन माघारी परतावे लागत आहे. दिवाळीचा पर्यटन हंगाम सुरू झाला असून, मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. अशा महत्त्वाच्या वेळी रॉक गार्डन काळोखात असल्याने स्थानिक व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे.
स्थानिक पर्यटन व्यवसायिकांनी वारंवार पालिका प्रशासनाचे लक्ष या समस्येकडे वेधले आहे. मात्र, अद्यापही वीज पुरवठा पूर्ववत करण्याची कोणतीही कार्यवाही सुरू झालेली नाही. पर्यटकांचे आकर्षण असलेले रॉक गार्डन सायंकाळनंतर काळोखात राहणे ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे, असे मत सौ. खोत यांनी व्यक्त केले.
खोत यांनी पालिका प्रशासनाला तातडीने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन रॉक गार्डन मधील वीज पुरवठा पूर्ववत करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. जर प्रशासनाने यात दिरंगाई केली, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.