उपअभियंता अजित पाटील यांना पुरस्कार जाहीर

सार्वजनिक बांधकाम विभागात उल्लेखनीय कामगिरी
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: September 19, 2025 12:53 PM
views 92  views

मालवण : सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन २०२४-२०२५ या कालावधीसाठी देण्यात येणारे पुरस्कार शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग मालवणचे उपअभियंता अजित पाटील यांनाही हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मंत्री महोदयांच्या उपस्थितीत लवकरच पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते, पूल, विविध विभागांच्या इमारती व इतर सार्वजनिक बांधकामे करण्यात येतात. इमारती/पुलांची संकल्पना तयार करुन व इतर माध्यमांचा म्हणजे संगणकाचाही उपयोग करुन संकल्पनाचित्रे बनवताना तसेच, सार्वजनिक इमारतीची विद्युतीकरणाची कामे करताना व प्रकल्प राबविताना जे तांत्रिक कौशल्य पणाला लागते आणि ज्यामुळे अशा अभियंत्यांची सेवा समाजाला भविष्यात फायद्याची ठरते, अशा अभियंत्यांचे प्रशासकीय तसेच तांत्रिक कौशल्य लक्षात घेऊन त्यांचा वैयक्तिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांचा १५ सप्टेंबर हा जन्मदिवस दरवर्षी "अभियंता दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अभियंत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येते.

सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील खालील विवरणपत्रात नमूद अधिकारी व कर्मचारी यांना सन २०२४-२५ या कालावधीकरीता वैयक्तिक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करुन गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य स्तरावर हा सन्मान निश्चितच प्रतिष्ठेचा असाच आहे.

▪️ अजित पाटील यांच्या बाबत थोडक्यात माहिती

पदनाम : सहायक अभियंता श्रेणी १ सा. बांध. विभाग, २०१५ साली रुजू. शिक्षण: १.बी. ई. (सिव्हिल), वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, सांगली, २००४-२००८. २००६ साली यूनिवर्सिटी टॉपर. एम. टेक (IIT Roorkee),  २०११, ९.०९ गुणांकनाने वर्गात अव्वल. २०११ ते २०१३: गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड या केंद्र शासनाच्या कंपनीमध्ये नोकरी. २०१३ ते २०१५ : सहायक अभियंता श्रेणी १ या पदावर जलसंपदा विभागात नोकरी. २०२३ साली भारतीय नौसेना दिवस मालवणमध्ये साजरा करण्याच्या नियोजनकामी कामगिरी बजावल्याबद्दल मान. एडमिरल, भारतीय नौसेना यांच्या हस्ते कमेंडेशन मेडल देवून सन्मान. शांत, संयम्मी आणि आदर्शवत सेवा बजावणारे अधिकारी अशी ओळख अजित पाटील यांनी आपल्या कार्यातून निर्माण केली. त्यांना मिळालेला पुरस्कार त्यांच्या आदर्शवत सेवेचा सन्मान आहे.