
मालवण : मालवण गवंडीवाडा येथे रस्त्यावर एका मोकाट गायीने वासराला जन्म दिला. वासराला कुत्रे त्रास देत होते. सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा यतीन खोत यांनी वैभववाडीतील गोशाळेेशी संपर्क साधला. गोशाळेतील गोसेवकांनी तात्काळ मालवणात येऊन गाय आणि वासराला गोशाळेत घेऊन गेले.
शहरातील गवंडीवाडा भागात एका गायीने वासराला जन्म दिला होता. तेथील स्थानिक अमोल येरलकर यांनी दोन दिवस वासराला कुत्र्यांपासून संरक्षण देत होते. गायीचा मालक समोर येत नसल्याने गाय वासराचं काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. सोशल मीडियावरही गाय, वासराचा फोटो टाकण्यात आला होता. मात्र, मालक समोर न आल्याने मयुरेश लुडबे यांनी शिल्पा खोत यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. भर पावसात वासरू असल्याने आणि वासराला कुत्र्यांचा होणारा त्रास लक्षात घेता शिल्पा खोत यांनी वैभववाडी खांबाळे येथील गाय वासरू गोशाळेशी संपर्क साधला. गोशाळेचे प्रफुल पवार, निलंय शेरे, पवार काका हे टेम्पो घेऊन मालवणात दाखल झाले.
गाय दोरीने बांधायला जाताच गाय पळू लागली. बजरंग दलाचे सदस्य गणेश चव्हाण, स्वप्नील घाडी, प्रसाद हळदणकर, यांनीही यावेळी मदत कार्यात सहभाग घेतला. कुत्र्यांच्या भुंकण्याने गाय घाबरली होती. अखेर रात्री साडे अकरा वाजता घाबरलेली गाय शांत होत वासराकडे आली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांनी आपल्या मांगरात गाय वासराला घेऊन गेले. त्याठिकाणी गायीला दोरी घालण्यात यश आले. त्यानंतर गाय आणि वासराला टेम्पोत चढविण्यात आले. त्यांच्यावर गोशाळेत पालन पोषण संगोपन करण्यात येणार आहे. भटक्या गुरांना चिन्हांकित करण्यात यावे जेणेकरून त्यांचा मालक समजू शकेल. मात्र पशुसंवर्धन विभागाकडून हे काम होत नाही. जखमी गुरांचा सांभाळ करण्यासाठी आपली गोशाळा काम करत असल्याचे गोसेवक प्रफुल पवार यांनी सांगितले.