मालवणच्या विनायकला अग्निवीरचा मान

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: August 20, 2025 18:05 PM
views 62  views

मालवण : येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा एनसीसी (राष्ट्रीय छात्र सेना) विभागाचा वरिष्ठ अंडर ऑफिसर आणि तृतीय वर्ष शास्त्र शाखेचा विद्यार्थी विनायक मानवर याची भारतीय नौदलाच्या अग्निवीर योजनेंतर्गत निवड झाली आहे.

विनायक हा अत्यंत सामान्य आणि गरीब कुटुंबातून आलेला मुलगा आहे. त्याचे वडील तानाजी आणि आई रुक्मिणी दुसऱ्यांच्या शेतात आणि इतर ठिकाणी मिळेल ते काम करून त्याला शिकवत आहेत. विनायकनेही स्वतः कॉलेज करत असताना अनेक ठिकाणी काम करून शिक्षण आणि एनसीसीचे प्रशिक्षण पूर्ण केले. कॉलेजमध्ये त्याने वरिष्ठ अंडर ऑफिसर म्हणून जबाबदारी सांभाळली असून अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्याची प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द यामुळे तो सर्वांसाठी एक आदर्श बनला आहे.

या यशामागे त्याच्या चार वर्षांच्या अथक मेहनतीसोबतच महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचे प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा. डॉ. मल्लेश खोत यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. एनसीसी आर्मी विंगमध्ये शिक्षण घेऊन नौदलात भरती होण्याची ही उल्लेखनीय घटना आहे. विनायकने ओडिशामधील 'आयएनएस चिल्का' येथे चार महिन्यांचे बेसिक ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. यामध्ये फायरिंग, स्विमिंग, ड्रिल, बोट पुलिंग आणि इतर नौदल-संबंधित प्रशिक्षण त्याने घेतले. आता तो पुढील प्रगत प्रशिक्षणासाठी कोची येथे जाणार आहे.

या यशाबद्दल कृ. सी. देसाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सेक्रेटरी गणेश कुशे, संदेश कोयंडे, नंदू देसाई, समीर गवाणकर, डॉ. शशिकांत झाट्ये, रामचंद्र काटकर, महादेव पाटकर, राजेंद्र खांडाळेकर, शैलेश पावसकर,बाळासाहेब पंतवालावलकर, प्रमोद ओरसकर, भाऊ सामंत, विजय केनवडेकर, कॉलेजचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, तसेच सर्व प्राध्यापक, एनसीसी कॅडेट्स, आणि कॉलेजमधील कर्मचाऱ्यांनी विनायकचे अभिनंदन केले आहे. याव्यतिरिक्त ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल, लेफ्टनंट कर्नल मंडलिक, सुभेदार मेजर सुधाकर कुलदीपकर, आणि सुभेदार दिनेश गेडाम यांनीही त्याचे कौतुक केले. पोलीस निरीक्षक मारुती जगताप,  तहसीलदार वर्षा झालटे यांनीही विनायकचे अभिनंदन करून हे मालवणसाठी एक कौतुकास्पद यश असल्याचे म्हटले आहे.

यानिमित्ताने एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. डॉ. मल्लेश खोत यांनी एनसीसीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, "एनसीसीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि समर्पण निर्माण होते. लष्कर, नौदल, हवाई दल, पोलीस दल आणि इतर अनेक सरकारी व खासगी क्षेत्रांमध्ये एनसीसी कॅडेट्सना प्राधान्य दिले जाते. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना, फक्त आठवड्यातून चार तास देऊन कोणताही विद्यार्थी एनसीसीमध्ये सहभागी होऊ शकतो. मालवण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतानाच एनसीसीमध्ये सामील व्हावे, जेणेकरून ते स्वतःचा, समाजाचा आणि देशाचा विकास साधू शकतील आणि देशसेवेला हातभार लावू शकतील. विनायक मानवरचे हे यश हेच सिद्ध करते की कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाने कोणतेही ध्येय गाठता येते असेही त्यांनी सांगितले.