
मालवण : प्रीपेड वीज मीटरमुळे तिप्पट, चौपट विजबिले येत असून सर्वसामान्यांची लूट होत आहे. मात्र याला विरोध दर्शविणारी एकही गोष्ट सत्ताधारी खासदार, पालकमंत्री, शिंदे गटाचे आमदार यांच्याकडून होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रीपेड मीटर हे भाजप, शिंदे गटाचे आणि महायुतीच्या सत्तेत असणाऱ्या सर्व घटकांचे हे पाप आहे असा आरोप ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.
ठाकरे शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, युवती सेना जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे, उपतालुका संघटक रूपा कुडाळकर, प्रसाद चव्हाण, शाखाप्रमुख गणेश चव्हाण, दीपक देसाई, अक्षय भोसले, सुरेश मडये, नरेश हुले, रवी मिटकर, हेमंत मोंडकर आदी उपस्थित होते.
श्री. खोबरेकर म्हणाले, स्वातंत्र्यदिनी येथील महावितरणच्या कार्यालयाबाहेर शहरातील खोत नावाच्या नागरिकाने महावितरणने आपल्याला न विचारता, परवानगी न घेता तसेच कोणतीही तक्रार नसताना वीज मीटर बदलण्यात आल्याचा आरोप केला. त्यामुळे महावितरणचे हे अधिकारी आमदार, खासदार, पालकमंत्री यांनाच नव्हे, तर खुद्द मुख्यमंत्र्यांनाही जुमानत नाहीत. सध्या फक्त सरकारी कार्यालयांमधील वीज मीटर बदलण्याचे आदेश आहेत, असे असतानाही सामान्य नागरिकांच्या घरात प्रीपेड मीटर बसवून त्यांची लूट केली जात आहे.
प्रीपेड मीटरमुळे विजेचे बिल दुपटी-तिपटीने वाढले आहे. तसेच हे मीटर बसवण्याचे काम एका खासगी ठेकेदाराला, म्हणजेच अदानीला देण्याची गरजच काय? असा प्रश्न खोबरेकर यांनी उपस्थित केला. एकीकडे सरकार 'बहिणीच्या घरात बहिणीचे पैसे' म्हणून मदत करतं, आणि दुसरीकडे वीज बिलाच्या माध्यमातून पैसे काढून घ्यायचे असे काम आता शासनाच्या माध्यमातून सुरू आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना पुढे करून ही लूट सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट आहे.
या प्रीपेड वीज मीटर बाबत भाजप आणि शिंदे गटाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आवाज उठवून नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविणार आहे का? असा प्रश्न खोबरेकर यांनी उपस्थित केला. सत्ताधाऱ्यांनी केवळ फक्त अदानीच्या विरोधात घोषणा देऊ नका, तर हा जीआर काढणाऱ्या मंत्र्यांविरोधातही घोषणा द्यावी." भाजपची राज्यात आणि केंद्रात सत्ता असतानाही हे प्रीपेड मीटर लावण्याचा शासन निर्णय रद्द केला जात नाही. त्यामुळे, हा शासन निर्णय आणि अदानीला दिलेले ठेके रद्द करण्याची धमक सरकारने दाखवावी. या अन्यायाविरोधात लोकांना जागृत करण्यासाठी, शासन निर्णयाची होळी करण्यासाठी आणि महावितरणवर जाब विचारण्यासाठी लवकरच मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा खोबरेकर यांनी दिला. या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर समविचारी घटक सहभागी होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.