
मालवण : तालुक्यातील मळावाडी येथे महसूल विभाग आणि आचरा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे तीन डंपर पकडले. आचरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, मसुरे मंडळ अधिकारी दीपक शिंगरे, मसुरे महसूल सेवक सचिन चव्हाण, बांदिवडेचे ग्राम महसूल अधिकारी भागवत जाधव, दत्तात्रय खुळपे आणि मळावाडीचे पोलीस पाटील नरेश मसुरकर सहभागी झाले होते.
कारवाईत पकडलेल्या तीन डंपर मालकांवर आचरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे डंपर पुढील कारवाईसाठी मसुरे आउटपोस्टच्या ताब्यात देण्यात आले आहेत. यात संदीप रामू फटकारे यांच्या मालकीच्या डंपर क्रमांक जीए ०९ यु ३०४४ आणि एमएच ०७ एजे ३०७२ या दोन डंपरचा तर मंदार खडपकर यांच्या मालकीचा डंपर क्रमांक जीए ०९ यु ०८३५ याचा समावेश आहे. या कारवाईमुळे बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यापुढेही महसूल विभागाकडून अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे.