
मालवण : गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चौके थळकरवाडी येथे वस्ती लगत असलेला महाकाय वटवृक्ष गुरुवारी सकाळी कोसळल्याची घटना घडली आहे. हे वटवृक्ष दोन घरांच्या मध्ये पडल्याने दोन्ही घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
गेले दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाने जोर पकडला आहे. या पावसाचा फटका चौके गावाला बसला आहे. चौके थळकरवाडी येथील प्राचीन महाकाय वटवृक्ष लगतच्या वंदना बाळकृष्ण गावडे व प्राची प्रशांत कुबल यांच्या दोन्ही घरांच्या मधोमध पडल्याने घरांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळतात चौके सरपंच पि.के चौकेकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच चौके तलाठी पोलीस पाटील यांना घटनेची कल्पना दिली. चौके तलाठी पी जी गुरव, चौके ग्राम अधिकारी लक्ष्मण सरमळकर यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. अंदाजे लाख रुपये नुकसान झाले असल्याने दोन्ही घरमालकांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.