
आचरा : नारींग्रे येथे झालेल्या रीक्षा अपघातात मृत्यू झालेल्या आचरा येथील रीक्षा व्यावसायिकांच्या घरी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी भाजपच्या वतीने तातडीची आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, राजन गावकर, महेश मांजरेकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, संतोष गावकर, प्रकाश मेस्त्री, समिर बावकर, मंदार सांबारी, पांडुरंग वायंगणकर, राजन पांगे, अजित आचरेकर, विजय निकम, धनंजय टेमकर, रविंद्र घागरे, मंदार सरजोशी, सिद्धार्थ कोळगे, प्रमोद वाडेकर यांसह अन्य उपस्थित होते.
नारींग्रे येथे झालेल्या भीषण रीक्षा अपघातात आचरा देवूळवाडी येथील संकेत सदानंद घाडी,गाऊडवाडी येथील संतोष रामजी गावकर,रोहन मोहन नाईक आणि पिरावाडी येथील सोनू कोळंबकर या तरुण युवकांचे दुःखद निधन झाले होते. यामुळे रीक्षा व्यवसायावर अवलंबून असणा-या या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.याबाबतची माहिती समजताच भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी रविवारी सायंकाळी आचरा येथे संबंधित कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले. तसेच चारही कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत देवू केली.
अपघाती विमा, नोकरी उपलब्ध करून देणार
यावेळी बोलताना भाजप अध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले की आचरा गावातील चार वेगवेगळ्या कुटुंबातील चार तरुण अपघातात गमावले आहेत. आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसहित आम्ही या चारी कुटुंबीयांची भेट घेतली. या कुटूंबात त्या तरुणांची लहान मुलं आहेत ज्या मुलांना वडील गेल्याचं समजू सुद्धा शकत नाही अशी स्थिती आहे. या सर्वाना आधाराची गरज आहे. भारतीय जनता पार्टी यांच्या नेहमीच मागे उभी राहणार आहे. म्हणूनच आज त्याना तातडीची आर्थिक मदत आम्ही केलीय येणाऱ्या काळात त्यांच्या कुटुंबाला विविध सरकारी योजना मधून सवलत देण्याबरोबर अपघाती विमा रक्कम उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून अपघातात मृत झालेल्या तरुणांच्या पत्नी या शिक्षित आहेत त्याना नोकरीं उपलब्ध करून देण्यासाठी भाजप प्रयत्नशील राहणार असल्याचे भाजपा अध्यक्ष सावंत म्हणाले.