
मालवण : मालवण शासकीय तंत्रनिकेतन मध्ये प्राचार्यांसह अनेक शिक्षक पदे रिक्त असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या प्रकाराची माहिती मिळताच आज ठाकरे शिवसेनेच्या युवासेनेने तंत्रनिकेतन मध्ये धडक देत उपस्थित प्राध्यापक वर्गाला जाब विचारला. तंत्रनिकेतन मधील ५२ पैकी केवळ १८ पदे भरलेली असून ३४ पदे रिक्त आहेत. तासिका तत्वावरील तसेच पर्यायी शिक्षकही उपलब्ध नाहीत, यामुळे लेक्चर होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून येत्या ऑक्टोबर मधील पहिल्या सेमिस्टर परीक्षेत मुले लिहिणार तरी काय ? असा प्रश्न युवासेना तालुकाप्रमुख मंदार ओरसकर यांनी करत प्राध्यापकाना धारेवर धरले.
दरम्यान मालवण शासकीय तंत्रनिकेतनच्या या दुरावस्थेकडे तंत्रशिक्षण विभागाच्या मंत्र्यांचे दुर्लक्ष होत असून यात राजकारण होत आहे असा आरोप मंदार ओरसकर यांनी करत ही परिस्थिती न सुधारल्यास युवासेनेतर्फे मुलांच्या हितासाठी आंदोलन छेडले जाईल, प्रसंगी तंत्रनिकेतनला टाळे ठोकले जाईल असा आक्रमक इशारा यावेळी दिला.
मालवण कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त असल्याबाबत युवासेना तालुकाप्रमुख मंदार ओरसकर यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह आज तंत्रनिकेतन मध्ये धडक दिली. यावेळी त्यांच्या समवेत सिद्धेश मांजरेकर, पियूष चव्हाण, उमेश चव्हाण, करण खडपे, हृतिक चव्हाण, रोषण कांबळी, सर्वेश लुडबे, मनीष आडकर, साहिल जाधव आदी उपस्थित होते. यावेळी प्रभारी दीपक बढेकर, आजच्या दिवसाचा प्राचार्य पदाचा पदभार असलेले प्रा. डी. एन. गोलतकर, विद्युत शाखेचे वाय. व्ही. महाडिक या प्राध्यापकाना मंदार ओरसकर यांनी जाब विचारला.
गेले काही वर्षे मालवण तंत्रनिकेतनचा कारभार सुरळीत सुरू होता. मात्र तंत्रनिकेतन विभाग आणि तासिका तत्वावरील शिक्षक यांच्यात न्यायालयीन केस चालू असल्यामुळे हे शिक्षक येथे उपलब्ध नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शिक्षकांअभावी लेक्चर होत नसल्याने विद्यार्थी घरीच बसून आहेत. येत्या ऑक्टोबर मध्ये प्रथम सेमिस्टर परीक्षा होणार आहे. यामध्ये प्रथम वर्षाची मुले परीक्षेत लिहिणार काय असा प्रश्न मंदार ओरसकर यांनी यावेळी केला.
यावेळी ओरसकर यांनी तंत्रनिकेतन व्यवस्थापनाकडे मागितलेल्या माहितीत शिक्षकांच्या ५२ पदांपैकी १८ पदे भरली असून ३४ पदे रिक्त झाली आहेत. इलेक्ट्रॉनिक विभागला सात शिक्षक उपलब्ध असून मेकॅनिकल व सिव्हिल विभागाला शिक्षक नसल्याची माहिती देण्यात आली. तसेच प्राचार्य पदही रिक्त आहे. यावर ओरसकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. शिक्षक पद रिक्त असल्यास जवळच्या कोल्हापूर, रत्नागिरी व कराड येथून उसनवारीने देण्यात येणारे शिक्षक मागणी करूनही याठिकाणी दिलेले नाहीत. शिक्षक नसल्याने कोणतीही पर्यायी व्यवस्था याठिकाणी उपलब्ध नाही. तासिका तत्वावरील शिक्षक येत नसल्याने त्यांचे वर्षभराचे पगाराचे ३० ते ४० लाख रुपये थकीत आहेत. या सर्व प्रकाराकडे तंत्रनिकेतन व्यवस्थापनाने तंत्रशिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार करूनही कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याबाबत ओरसकर यांनी नाराजी व्यक्त करत यामागे राजकारण असल्याचा आरोप केला. याबाबत आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधण्यात आले असून त्यांच्या मार्फत पाठपुरावा होणार आहे. तंत्रशिक्षण विभागाच्या मंत्र्यांनी याबाबत लक्ष देऊन उपाययोजना न केल्यास युवासेनेकडून तीव्र आंदोलन छेडले, प्रसंगी तंत्रनिकेतनला टाळे ठोकले जाईल, असा इशारा यावेळी मंदार ओरसकर यांनी दिला.
फोटो - शासकीय तंत्रनिकेतन येथे धडक देत उपस्थित प्राध्यापकांना जाब विचारताना युवा सेना पदाधिकारी.