
मालवण : मालवणातील काही महिलांनी मालवणातीलच दोन महिलांविरोधात सावकारी व्याजाच्या वसुलीबाबतच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दिल्या आहेत. मात्र त्यावर अद्यापही पोलीस प्रशासनाकडून संबंधितांवर गुन्हा दाखल झालेला नाही. याबाबत पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची भेट घेत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा आम्हाला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असा इशारा पोलीस प्रशासनास दिला असल्याची माहिती महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे अध्यक्ष ऍड. प्रसाद करंदीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालवण येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी समिती सदस्य डॉ. कमलेश चव्हाण, राजेश माने, विष्णू परब आदी उपस्थित होते. यावेळी करंदीकर म्हणाले, मालवण पोलीस ठाण्यात गेल्या दोन महिन्यात तीन महिलांनी मालवणातीलच दोन महिलांविरोधात सावकारी व्याजाच्या वसुलीसाठी दिल्या जाणाऱ्या त्रासाबाबत तक्रार देण्यात आल्या.
असहाय अज्ञानी महिलांनी याबाबतच्या तक्रारी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच लोकाधिकार समितीकडेही पाठविल्या होत्या. पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार दोन महिला या बेकायदेशीर पद्धतीने खासगी सावकारी चालवून त्याच्या व्याजाच्या वसुलीसाठी अन्यायाची आगळीक चालवीत असल्याचे दिसून येत आहे. काही तक्रारदारांच्या बाबतीत काही खासगी सावकारांनी तक्रारी मिटविण्याचे प्रकारही दिसून आले. त्यामुळे तक्रारीच्या अनुषंगाने तसेच खासगी सावकारांना कायद्यानुसार प्रतिबंध बसण्यासाठी कारवाई होणे गरजेचे असल्याचे पोलीस निरीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. यापूर्वीही काहींनी कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी कार्यवाही व्हायला हवी याबाबतही पोलिसांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
सद्यस्थितीत खासगी सावकारी चालविणाऱ्या अशा अपप्रवृत्तींना कायद्याचे बंध लागण्याच्या दृष्टीकोनातून सर्व संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे बनले आहे. आपल्यास्तरावरुन सावकारांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी. तसे न झाल्यास यापुढील कालावधीत सर्वसामान्य व्यवसायिकांच्या कर्जामुळे आत्महत्या होण्यास विलंब लागणार नाही. या वस्तुस्थितीचा विचार करुन सर्व संबंधितांवर कारवाई करावी, तसे न झाल्यास संघटनेच्यावतीने अशा गंभीर विषयाला शासनाच्या, प्रशासनाच्या व समाजाच्या पटलावर आणण्यासाठी लोकशाही मार्गाने घटनात्मक चौकटीत राहून आंदोलनात्मक भूमिका घेणे भाग पडेल व अशावेळी निर्माण होणाऱ्या स्थानिक कायदा, शांतता व सुव्यवस्थेच्या प्रश्नास सर्वं संबंधित जबाबदार राहतील असा इशारा देण्यात आला असल्याचेही श्री. करंदीकर यांनी स्पष्ट केले आहे.